Pune News : बाणेर रस्त्यावर भरधाव वेगातील कार पलटली, एकाचा मृत्यू तर दोघे जखमी

एमपीसी न्यूज : बाणेर रस्त्यावरील माऊली पेट्रोल पंपासमोर भरधाव वेगात कार जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे कार रस्त्यावरून पलटी झाली. या अपघातात चालकाचा मृत्यू झाला तर इतर दोघे जण जखमी झाले आहेत. बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. 

गणेश सोमेश्वर घनचक्कर (वय 25) असे मृत्युमुखी पडलेल्या कार चालकाचे नाव आहे. तर साहिल कुलकर्णी आणि सचिन जाधव हे दोघे जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलीस हवालदार अशोक वनवे यांनी फिर्याद दिली असून चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हे तिघे जण कारमध्ये बसून निघाले होते. गणेश घनचक्कर हा कार चालवत होता. त्याची गाडी बाणेर रस्त्यावरील माऊली पेट्रोल पंपावर आली असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार पलटी झाली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने चालकाचा मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.