Pune News : अंत्यविधीदरम्यान रॉकेलचा भडका उडून झालेल्या दुर्घटनेतील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू

एमपीसी न्यूज : पुण्यातील कैलास स्मशानभूमीत एका मृतदेहावर अंत्यसंस्कार सुरू असताना चितेवर रॉकेल टाकत असताना भडका उडून दुर्घटना झाली होती. यामध्ये अंत्यसंस्कारासाठी जमलेले आठ जण जखमी झाले होते. जखमींपैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अनिल बसना शिंदे (वय 53) असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. 30 एप्रिल रोजी ही दुर्घटना घडली होती. बंडगार्डन पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

गणेश सर्जेराव रणसिंग (वय 49,रा. दत्तविहार, आव्हाळवाडी, वडजाई) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव  असून त्याला अटक करण्यात आली आहे. प्रतीक दीपक कांबळे (वय 24) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 एप्रिल रोजी फिर्यादीच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. रात्री 8 वाजण्याच्या सुमारास कैलास स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यविधी सुरू होते. अंत्यविधीसाठी अनेक नागरिक एकत्र जमले होते. हे सर्व नागरिक चिते पासून काही अंतरावर बसली असताना आरोपी गणेश रणसिंग याने हातामध्ये रॉकेलचा कॅन घेऊन निष्काळजीपणाने त्यातील रॉकेल चितेवर ओतले. यादरम्यान हातातील प्लॅस्टिकच्या कॅनने पेट घेतल्याने त्याचा भडका उडाला. त्यावेळी आरोपीने हातातील पेटता कॅन जोरात फेकल्याने 7 ते 8 जण भाजले होते. यामध्ये गंभीरपणे भाजलेल्या अनिल शिंदे याचा मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.