Param Bir Singh : परमबीर सिंग यांच्या ‘लेटरबॉम्ब’नंतर ‘ऑपरेशन लोटस’ ऍक्टिव्ह?

जाणून घ्या या प्रकरणात आतापर्यंत काय काय घडलं...

एमपीसी न्यूज : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना ईमेलद्वारे एक पत्र पाठवले. त्या पत्रात गृहमंत्र्यांनी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना महिन्याला 100 कोटी रुपये जमा करण्याचे टार्गेट दिल्याचा उल्लेख होता. त्यानंतर केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशात खळबळ उडाली आहे. सचिन वाझे प्रकरणामुळे अडचणीत आलेले ठाकरे सरकार आता आणखी गोत्यात आले आहे. त्यामुळे भाजपला आयते कोलीत मिळाले असून या निमित्ताने पुन्हा एकदा भाजपकडून ऑपरेशन लोटस ऍक्टिव्ह करण्यात आल्याचे बोलले जात आहे. 

मुंबईचे बदली झालेले पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना तब्बल आठ पानी पत्र लिहून महाराष्ट्राच्या राजकारणात जी खळबळ उडवली आहे. यात अर्थातच गृहमंत्री अनिल देशमुख हे टार्गेटवर आहेत. पण यातून काही प्रश्न निर्माण होत आहेत. ते परमवीर सिंग यांच्या पत्राच्या टायमिंगवरून  व त्यांच्या बोलविता धनी कोण, असे प्रश्न उपिस्थत होत आहेत.

आता ही संधी साधत भाजपने आज  (21 मार्च)  भ्रष्टाचारी महविकास आघाडी सरकारच्या राजीनाम्यासाठी आणि अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करणार आहेत. पुण्यात 10 वाजता अलका टॉकीज चौकात जाहीर निदर्शने केली जाणार आहेत. दरम्यान, देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, राज ठाकरे, किरीट सोमय्या या सगळ्यांनी अनिल देशमुख यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, असा आक्रमक पवित्रा घेतला आहे.

परमबीर सिंह यांनी पात्रात काय लिहलय 

पत्रात परमबीर सिंह यांनी म्हटले आहे की, “सचिन वाझे यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या सरकारी बंगल्यावर गेल्या काही महिन्यात फंड जमा करण्यासाठी अनेकदा बोलावले होते. फेब्रुवारीच्या दरम्यान या भेटी झाल्या. अशा भेटीदरम्यान अनेकदा एक-दोन स्टाफ मेंबर आणि देशमुख यांचे स्वीय सहाय्यक पालांडे देखील तिथे उपस्थित होते. गृहमंत्र्यांनी सचिन वाझे यांना महिन्याला 100 कोटी रुपये जमा करण्याचं टार्गेट दिलं होतं. टार्गेट पूर्ण करण्यासाठी जवळपास 1 हजार 750 बार, रेस्टॉरंट आणि मुंबईतील काही बाबींचा समावेश होता. ज्यातून प्रत्येकाकडून 2-3 लाख रुपये जमा करण्याचे आदेश दिले होते. म्हणजेच महिन्याकाठी 40-50 कोटी रुपये जमा होतील. उर्वरित पैसे हे इतर बाबीतून मिळवता येतील, असं म्हणता येईल.” परमबीर सिंह यांनी आपल्या पत्रात दादरा नगर हवेलीची खासदार मोहल डेलकर आत्महत्या प्रकरणात अनिल देशमुख यांनी दबाव टाकल्याचाही उल्लेख केला आहे. परमबीर सिंह यांच्या मते, 22 फेब्रुवारीला जेव्हा मुंबईतील हॉटेलमध्ये मोहन डेलकर यांच्या मृतदेहासह सुसाईड नोटही मिळाली. या नोटमध्ये काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना कंटाळून आत्महत्या केल्याचे डेलकर यांनी म्हटले होते, परंतु अनिल देशमुख सातत्याने आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यासाठी मुंबई पोलिसांवर दबाव टाकत होते.

 काय म्हणाले अनिल देशमुख : 

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हे आरोप फेटाळले आहेत. दरम्यान, आता एक प्रसिद्धीपत्रक जारी करुन, परमबीर सिंह यांनी हे आरोप सिद्ध करावे अन्यथा अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार असल्याचा इशारा देशमुख यांनी दिला आहे.

परमबीर सिंह यांनी माझ्यावर केलेले आरोप खोटे असून स्वतःचा बचाव करण्यासाठी मला आणि महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी त्यांनी रचलेले हे षड्यंत्र आहे. पुढील महत्त्वाच्या गोष्टींवर मी आपले लक्ष वेधू इच्छितो त्यावरून परमबीर सिंह हे कसे खोटे बोलत आहेत, ही बाब आपल्या लक्षात येईल. सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर परमबीर सिंह एवढे दिवस शांत का बसले होते? त्याचवेळी त्यांनी आपले तोंड का उघडले नाही?

आपणास उद्या म्हणजे दिनांक 17 मार्च रोजी पोलीस आयुक्त पदावरून हटविण्यात येणार आहे हे लक्षात आल्यानंतर परमबीर सिंह यांनी दिनांक 16 मार्चला एसीपी पाटील यांना व्हॉटसअप चॅटवरून काही प्रश्न विचारले आणि त्यांना अपेक्षित असलेली उत्तरे मिळविली. हा परमबीर सिंह यांच्या मोठ्या कटाचा भाग होता. या चॅटच्या माध्यमातून परमबीर सिंह यांना पध्दतशीरपणे पुरावे जमा करायचे होते. या चॅटवरून उत्तरे मिळविताना परमबीर सिंह किती अधीर झाले होते हे त्यांच्या चॅटवरून आपल्या लक्षात येईल.

परमबीर सिंह हे एसीपी पाटील यांच्याकडून वारंवार वदवून घेत आहेत. याचा अर्थ काय? 18 मार्च रोजी मी लोकमतच्या कार्यक्रमामध्ये परमबीर सिंह यांच्याविरुद्ध काही गंभीर स्वरूपाच्या बाबी पुढे आल्यामुळे त्यांना पदावरून हटविले असल्याचे म्हटल्यानंतर परमबीर सिंह यांनी स्वतःला वाचविण्याच्या दृष्टीने 19 मार्च रोजी पुन्हा व्हाट्सअप वर संभाषणाचे पुरावे तयार करण्याचा प्रयत्न केला.

पोलीस खात्यातील सर्वांना माहीत आहे की सचिन वाझे व एसीपी संजय पाटील हे परमबीर सिंह यांच्या अत्यंत जवळचे आहेत. 16 वर्षे निलंबित असलेल्या वाझे यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय परमवीर सिंह यांनी स्वतःच्या अधिकारात घेतला.

परमबीर सिंह यांचे आरोप धादांत खोटे आहेत त्यांनी आपले आरोप सिद्ध करावेत. मी त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करीत आहे. स्वतःला वाचविण्यासाठी परमबीर सिंह यांनी हे खोटे आरोप केले आहेत.सचिन वाझे यांनी फेब्रुवारीमध्ये परमबीर सिंह यांना भेटून हे सर्व सांगितल्याचे परमबीर सिंह म्हणतात तर त्याचवेळी त्यांनी का सांगितले नाही. एवढे दिवस शांत का होते?

विस्फोटक प्रकरणात आपण अडचणीत येऊ शकतो हे लक्षात आल्यानंतर परमबीर सिंह यांनी असे खोटे आरोप करून सरकारला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला आहे.स्फोटके प्रकरण आणि मनसुख हिरण यांचा संशयास्पद मृत्यू या गंभीर प्रकरणाचा तपास भरकटविण्यासाठी परमबीर सिंह यांनी रचलेले हे षडयंत्र आहे मुख्यमंत्री यांनी परमबीर सिंह यांच्या आरोपाची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणीही अनिल देशमुख यांनी केली आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्टीकरण

दरम्यान परमबीर सिंह यांच्या पत्राबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने पत्राबाबत म्हटले आहे की, गृहरक्षक दलाचे कमांडट जनरल परम बीर सिंग यांच्या नावाने मुख्यमंत्री सचिवालयाच्या अधिकृत इमेलवर आज (20 मार्च) दुपारी 4.37 वाजता पत्र प्राप्त झाले आहे. [email protected] या ईमेल पत्त्यावरून परम बीर सिंग असे केवळ नाव लिहिलेले व स्वाक्षरी नसलेल्या या पत्राचा ईमेल पत्ता तपासून घेण्यात येत आहे , त्याचप्रमाणे परम बीर सिंग यांना गृहविभागामार्फत संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. वास्तविक पाहता परम बीर सिंग यांनी अधिकृतरीत्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या यादीसाठी दिलेला वैयक्तिक ईमेल पत्ता [email protected] असा आहे त्यामुळे आज प्राप्त झालेला ईमेल तपासून घेणे आवश्यक आहे असे मुख्यमंत्री कार्यालयामार्फत स्पष्ट करण्यात आलं आहे.

मुख्यमंत्री कारवाई करत नसतील तर हे गंभीर – देवेंद्र फडणवीस
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. परमबीर सिंह यांचे पत्र धक्कादायक आणि खळबळजनक आहे. एका डीजी रँकच्या अधिकाऱ्याने असे पत्र गृहमंत्र्यांबद्दल लिहिण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे फडणवीस म्हणाले. या पत्रासोबत एक चॅटही जोडली असून गृहविभागात नियुक्ती किंवा बदलीबद्दल जे काही घडत होते, त्याचा हा कळस असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी फडणवीस यांनी केली. मुंबई पोलीस दलाचं खच्चीकरण करणारी, मानहानी करणारी ही घटना आहे. गृहमंत्री पदावर राहिल्यानंतर याची चौकशी कशी होईल? कोणी छोट्या मोठ्या व्यक्तीने लावलेला आरोप नाही. एका डीजी रँकच्या अधिकाऱ्यांनी आरोप केला आहे. पुरावा म्हणून चॅटही सोबत जोडलेलं आहे, तो पुरावाच आहे. परमबीर सिंह यांनी लक्षात आणून दिल्यानंतरही जर मुख्यमंत्री कारवाई करत नसतील तर हे गंभीर आहे. आपलं सरकार वाचवण्यासाठी त्यानी दुर्लक्ष केलं असल्याची गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

राज ठाकरेंकडून उच्चस्तरीय चौकशीची मागणी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सदर प्रकरणी ट्विट करत उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली. ही घटना पाहता महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमाच लागला आहे, अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली. ‘मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग ह्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र अत्यंत धक्कदायक आहे. महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारी ही घटना आहे. गृहमंत्री अनिल देशमुख ह्यांनी तात्काळ राजीनामा द्यायलाच हवा आणि ह्या प्रकरणात त्यांची उच्चस्तरीय चौकशी देखील व्हायला हवी’, असं त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं. राज ठाकरे यांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासमवेत या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचीही मागणी केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.