PCMC : महापालिकेतील ‘त्या’ अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सामान्य प्रशासन (PCMC) विभागाने केलेल्या पाहणीत महापालिका मुख्यालयासह क्षेत्रीय कार्यालये, पालिका रूग्णालयात तब्बल 235 अधिकारी, कर्मचारी जागेवर हजर नसल्याचे समोर आले होते. या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करून 15 मे पर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त वामन नेमाणे यांनी दिले आहेत.

महापालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्यामुळे 12 मार्च 2022 पासून प्रशासकीय राजवट सुरू आहे. महापालिका आयुक्त शेखर सिंह हेच प्रशासक म्हणून कामकाज पाहत आहेत. मात्र, प्रशासकीय राजवटीत पालिकेत सर्व अलबेल असाच कारभार सुरू असल्याचे वारंवार निदर्शास आले. पालिकेत विविध कामासाठी आलेल्या नागरिकांना अधिकारी, कर्मचारी भेटत नाहीत. कार्यालयीन वेळेत नेमून दिलेल्या जागेवर उपलब्ध नसल्याच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या होत्या. पर्यायाने आयुक्त सिंह यांच्या कारभारवरच नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात होती.

Karnataka Election Result : कर्नाटक काँग्रेसच्या विजयात पिंपरी-चिंचवडमधील ‘या’ महिला नेत्यांचा  वाटा..

18 जानेवारी 2023 रोजी सामान्य प्रशासन विभागाने विविध पथकांची नेमणूक करत महापालिका मुख्यालय, क्षेत्रीय कार्यालये, पालिकेची रूग्णालये, दवाखान्यांची पाहणी केली. या पाहणीमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून कनिष्ठ कर्मचाऱ्यापर्यंत असे तब्बल 235 जण जागेवर नसल्याचे पथकाच्या निदर्शास आले. तसा अहवाल सामान्य प्रशासन (PCMC) विभागाने तयार करून संबंधित विभागातील प्रमुखांना अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

विभाग प्रमुखांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर शिस्तीबाबत नियमाधिन असलेली ठोस अशी कारवाई करावी. तसेच या कारवाईचा अहवाल 15 मे पर्यंत सामान्य प्रशासन विभागाकडे सादर करावा, असा आदेश सहाय्यक आयुक्त नेमाणे यांनी नुकतेच दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.