Pimpri: औद्योगिक कंपन्या ‘स्वयंस्फूर्तीने’ बंद करा; आयुक्त श्रावण हर्डीकर यांचे आवाहन

एमपीसी न्यूज –  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. पुढील वीस दिवस अतिशय महत्वाचे आहेत. त्यामुळे कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील औद्योगिक कंपन्या ‘स्वयंस्फूर्तीने’  बंद कराव्यात, असे आवाहन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे. त्यावर व्यवस्थापनाशी अंतर्गत चर्चा करुन संध्याकाळपर्यंत निर्णय घेण्याचे आश्वासन कंपन्यांच्या प्रतिनिधींनी आयुक्तांना दिले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील औद्योगिक कंपन्यांच्या व्यवस्थापकांसोबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज (शुक्रवारी) बैठक घेतली. टाटा मोटर्स, बजाज यासह बहुतांश कंपन्यांचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते. सीआयआय, एमपीसीआय, मराठा चेंबर्स, पिंपरी-चिंचवड लघुउद्योजक संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, काही कंपनीचे प्रतिनिधी ‘व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे’ सहभागी झाले होते. दरम्यान, जीवनावश्यक वस्तुंची दुकाने वगळता राज्य सरकारने पिंपरी-चिंचवड शहर ‘शट डाऊन’ केले आहे.

आयुक्त हर्डीकर म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहरातील ऑटोमोबाईल, अवजड यंत्र सामग्री उत्पादन करणा-या कंपन्यांना ‘स्वयंस्फूर्तीने’ बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. कंपनीचे सगळेच कामकाज पूर्णपणे बंद करण्याची विनंती केली. त्यावर महापालिकेने आम्हाला मार्गदर्शक सूचना द्याव्यात. त्यानुसार कारवाई केली जाईल. व्यवस्थापनाशी चर्चा केली जाईल, असे कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सांगितले. लघुउद्योजक संघटनेला देखील बंद ठेवण्याची विनंती केली आहे. मोठ्या औद्योगिक कंपन्या जो निर्णय घेतील. तो आम्ही मान्य करु असे त्यांनी सांगितले. त्यानुसार त्यांची चर्चा सुरु असून अंतर्गत चर्चा करुन महापालिकेला निर्णय सांगतो, असे प्रतिनिधींनी सांगितले आहे.

पिंपरी-चिंचवड लघुउद्योजक संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे म्हणाले, ”कोरोनोचा फैलाव रोखण्यासाठी आमची बंद करण्याची तयारी आहे. राज्य सरकारचे आदेश येताच आम्ही बंद ठेवू, सरकारच्या निर्णयाला आमचा पाठिंबा आहे. केवळ आम्ही पुरवठा करतो. त्या मोठ्या कंपन्या देखील बंद केल्या पाहिजेत”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.