PCMC News : मिळकतीला मोबाईल नंबर लिंक करा अन् सामान्यकरात तीन टक्के सवलत मिळवा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागाच्या वतीने मिळकतींना कर आकारणी केली जाते. मिळकत धारकांनी मोबाइल क्रमांक मिळकतींना लिंक केल्यास महापालिकेच्या विविध योजनांची माहितीसह त्यांना दरवर्षी महापालिकेच्या बिलाची लिंक उपलब्ध होणार आहे. (PCMC News) तसेच मिळकत धारक कधीही आणि कुठेही कराचा भरणा करू शकतील. याचा विचार करून जे मिळकत धारक मिळकतींना मोबाईल क्रमांक लिंक करतील, अशा मिळकत धारकांना सामान्यकरात तीन टक्के सवलत देण्यात येणार आहे. या विषयाला आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मंजुरी दिली.

पिंपरी-चिंचवड शहरात 5 लाख 88 हजार मिळकती आहेत. या मिळकतींपैकी आत्तापर्यंत 2 लाख 80 हजार मिळकत धारकांचे मोबाइल क्रमांक लिंक झाले आहेत. तर उर्वरित तीन लाख 8 हजार मिळकतींना मोबाईल क्रमांक लिंक नाहीत.

मिळकतींना महापालिकेच्या करसंकलन विभागाच्या वतीने कराची आकारणी करण्यात येत असते. नागरिकांना कर भरण्यासाठी शहराच्या विविध भागात कर संकलन विभागाचे 17 केंद्र आहेत. कर ऑनलाइन भरण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच ऑनलाइन कर भरण्यासाठी महापालिकेच्या वतीने वेळोवेळी प्रोत्साहनही देण्यात येत असते. त्यामुळे ऑनलाइन कर भरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ऑनलाइन कर भरताना नागरिकांकडून त्यांचा मोबाइल क्रमांक घेतला जात आहे. हा क्रमांक मिळकतींना लिंक होत आहे. मोबाइल क्रमांक लिंक झाल्याने मिळकत धारकांना महापालिकेच्या विविध योजनांची माहिती आणि दरवर्षी कराचे बिलाची मोबाइलवर लिंक येणार आहे. त्यामुळे नागरिकांना कर भरण्यास अधिक सोईचे होणार आहे. जेणेकरून एखादा नागरिक प्रवासात असला तरी तो कर भरू शकेल, हा महापालिकेचा उद्देश आहे.

Pune News : व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या टोळीला पुण्यातून अटक

मिळकत धारकांनी मालमत्ता कराची रक्कम  वेळेत भरावी, पालिकेच्या  उत्पन्नात वाढ होण्यासाठी  विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. याच अनुषंगाने आकारणी रजिस्टरला नोंद असलेल्या मालमत्तेचे मालक किंवा भोगवटादार यांचे मोबाईल क्रमांक संगणक प्रणालीमध्ये जोडणी केलेले नाहीत.(PCMC News) मोबाईल क्रमांक अद्ययावत नाहीत, अशा नागरिकांना मालमत्ता कराची बिले, कर भरणा, कर सवलती, नोटीसा, आदेश इत्यादी संपर्क करुन पोहोच करणे.  मालमत्ता कर विषयक माहिती,  सूचना नागरिकांना प्राप्त होण्यासाठी जे मालमत्ताधारक 31 डिसेंबर 2022 पूर्वी त्यांचे मिळकतीला  मोबाईल क्रमांक लिंक किंवा अद्ययावत करुन थकबाकी व चालू मागणीचे मूळ कराची रक्कम ऑनलाईन पध्दतीने भरणा करतील अशा मालमत्ताधारकांना चालू मागणीतील सामान्यकरात 3 टक्के सवलत देण्यास आयुक्त सिंह यांनी मंजुरी दिली आहे.

याबाबत कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख म्हणाले, नागरिकांना घर बसल्या जास्तीत-जास्त सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेच्या कर संकलन (PCMC News) विभागाचा सातत्याने प्रयत्न आहे. कर भरण्यासह नागरिकांना कर संकलन विभागाच्या सर्व सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी मिळकतीला मोबाईल क्रमांक जोडून सामान्य करात तीन टक्के सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही देशमुख यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.