PCMC : यांत्रिकी पद्धतीने रस्ते सफाईला अजूनही मुहूर्ताची प्रतीक्षा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील 18 मीटरपेक्षा अधिक रुंदीचे मोठे रस्ते आणि मंडई व इतर मोकळ्या जागा यांत्रिकी पध्दतीने साफसफाईला 15 ऑगस्टपासून सुरुवात करण्याचा प्रशासनाचा मानस होता. मात्र, प्रशासनाने दिलेले आत्तापर्यंतचे चार मुहूर्त हुकले आहेत. राज्यातील बड्या नेत्याला बोलवून यांत्रिकी पद्धतीने साफसफाईला प्रारंभ करण्याचा प्रशासनाचा विचार आहे. नेत्यांकडून वेळ मिळत नसल्याने यांत्रिकी रस्ते साफ-सफाईला मुहूर्त मिळत नसल्याचे दिसून येत आहे.
Pune : चिंचवड परिसरात 24 तासाच 52 मिमी पावसाची नोंद, पुणे जिल्ह्याला यलो अलर्ट
महापालिकेमार्फत शहरातील रस्ते यांत्रिकी पद्धतीने साफसफाईचे कामकाज करण्यात येते. निविदा प्रक्रियेद्वारे डी. एम. एंटरप्रायजेस आणि बी.व्ही.जी. इंडिया या दोन संस्थांना दिले होते. त्यांची मुदत संपल्यानंतर 2020 मध्ये शहरातील 18 मीटर व त्यावरील रस्त्यांची यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करण्याच्या कामकाजासाठी पॅकेज निहाय दर मागविण्यात आले होते. शहराचे दक्षिण आणि उत्तर असे दोन भाग करून चार पॅकेजमध्ये हे काम केले जाणार आहे. चार पॅकेजमध्ये ही निविदा होती.
दक्षिण भागासाठी 331 किलोमीटर अंतराचे आणि उत्तर भागासाठी 339.15 किलोमीटर अंतराचे मोठे रस्ते आहेत. त्यामध्ये शहरातील महामार्ग, बीआरटीएस मार्ग व 18 मीटरपेक्षा अधिक रुंदीचे रस्ते तसेच मंडई व इतर मोकळ्या जागाचा समावेश आहे. प्रत्येक भागासाठी विविध प्रकारचे प्रत्येकी 16 रोड स्वीपर व 16 इतर वाहने आणि 55 कर्मचारी असणार आहेत. 16 रोड स्वीपरच्या मार्फत प्रत्येकी 40 किलो मीटर रस्ते साफ केले जाणार आहेत.
दरम्यान, शहरातील अंतर्गत रस्ते साफ-सफाईसाठी सद्यस्थितीत 4 एजन्सी कार्यरत आहेत. यासाठी महापालिकेकडून दरमहा 5 कोटी रूपयांचा खर्च करण्यात येत आहे.
आत्तापर्यंत चार मुहूर्त हुकले
यांत्रिकी पध्दतीने रस्ते सफाईची निविदा जुलै 2022 मध्ये राबविली होती. एक वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाल्यानंतरही प्रत्यक्षात कामकाज सुरू झालेले नाही. जूनमध्ये पालिकेने चार एजन्सीला वर्क ऑर्डर दिली आहे. रोड स्वीपर हे जर्मनी आणि इटली येथून आणले आहेत. काही मोटारींची आरटीओची प्रक्रिया सुरू आहे. प्रशासनाने यांत्रिकी पध्दतीने रस्ते सफाईचा श्रीगणेशा 15 ऑगस्टला करण्याचे सांगितले होते. मात्र, प्रशासनाने आत्तापर्यंत दिलेले चार मुहूर्त हुकले आहेत.
याबाबत अधिक माहिती घेतल्यानंतर यांत्रिकी साफसफाईच्या 8 गाड्या दाखल झाल्याची माहिती मिळाली आहे. आरटीओकडे रोड स्वीपरचे रजिस्ट्रेशन बाकी आहे. तसेच राज्यातील मंत्र्यांना बोलावून शहरात एक मोठा कार्यक्रम घेण्याचे पालिकेने नियोजन केले आहे. मंत्र्यांची वेळ मिळाल्यानंतर हा कार्यक्रम होणार असल्याचे समजले आहे.