PCMC :  दोन महिन्यांत 25 टक्यांपेक्षा जास्त मालमत्ता धारकांनी भरला कर!

एमपीसी न्यूज  – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाच्या कामगिरीचा (PCMC) आलेख दिवसेंदिवस वाढतच आहे. 2023-24 या आर्थिक वर्षातील अवघ्या दोन महिन्यांत 204 कोटी रुपयांचा कर महापालिका तिजोरीत जमा झाला आहे. तर 25 टक्यांपेक्षा जास्त मालमत्ता धारकांनी कराचा भरणा केला आहे. यामध्ये निवासी मालमत्ता धारकांची कर भरण्यात सर्वाधिक आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.

शहरात निवासी, औद्योगिक, बिगर निवासी, मिश्र, मोकळ्या जमीन अशा  6 लाख 2 हजार 203 नोंदणीकृत मालमत्ता आहेत.  या मालमत्ता धारकांकडून महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभाग कर वसूल करत आहे. गतवर्षी या विभागाच्या वतीने राबविलेल्या विविध उपक्रम, जनजागृती, जप्ती मोहीम, मालमत्ता धारकांना नोटीसा, नळ कनेक्शन बंद करणे, थकबाकीदारांची वृत्तपत्रात नावांची यादी प्रसिद्ध करणे यासह यंदा महिला बचत गटांच्या माध्यमातून बिलांचे घरपोच वाटप अशा विविध बाबींमुळे दोन महिन्यांत दोनशे कोटी रुपयांचा कर वसूल करण्यात विभागाला यश आले आहे.

6 लाख 2 हजार 203 मालमत्ता धारकांना पैकी 1 लाख 62 हजार मालमत्ता धारकांनी 204 कोटी 66 हजार रुपयांचा कर महापालिका तिजोरीत जमा केला आहे.

1 लाख 22 हजार 931 मालमत्ता धारकांनी भरला ऑनलाईन कर

ऑनलाईन कर भरण्यास नागरिकांची मोठी पसंती मिळत आहे. तब्बल 1 लाख 22 हजार 931 मालमत्ता धारकांनी 151 कोटी 96 लाख 28 हजार रूपयांचा ऑनलाईन कराचा भरणा केला आहे. विविध ॲपच्या माध्यमातून 2 हजार 746 जणांनी 2 कोटी 42 लाख 87 हजार, 5 हजार 669 जणांनी 16 कोटी 23 लाख रुपयांचा कर धनादेशाद्वारे जमा केला आहे.

Odisha train accident : ओडिशा रेल्वे अपघात …अपघात की घातपात?

असा आला कर
ऑनलाईन – 151कोटी 96 लाख 28 ह
विविध ॲप – 2 कोटी 42 लाख 87 ह
रोख.       –  25 कोटी 85 लाख 83 ह
धनादेशाद्वारे – 16 कोटी 23 लाख
इडीसी- 2 कोटी 39 लाख
आरटीजीएस – 3 कोटी 42 लाख

25 कोटी 85 लाखा रूपयांचा रोखीने भरणा
महापालिकेने प्रथमच महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून महिला बचत गटांच्या सिद्धी प्रकल्पाअंतर्गत घरपोच बिले वाटप केली आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि ज्या नागरिकांना ऑनलाईन कराचा भरणा करण्यास अडचण येणाऱ्या अशा 27 हजार 683 नागरिकांनी 25 कोटी 85 लाख 83 हजार रूपयांचा रोख स्वरूपात कर भरला आहे.

कर भरण्यात निवासी मालमत्ता धारकांची आघाडी

1 लाख 61 हजार 359 मालमत्ता धारकांनी कराचा भरणा केला आहे. यामध्ये तब्बल 1 लाख 46 हजार 91 निवासी मालमत्ता धारकांनी आपल्या कराचा भरणा केला आहे. त्यानंतर 11 हजार 675 बिगर निवासी, 2 हजार 789 मिश्र, 1 हजार 45 औद्योगिक तर   974 मोकळ्या जमीन असणाऱ्या मालमत्ता धारकांनी कराचा भरणा केला आहे. यामध्ये  वाकड झोनमध्ये सर्वाधिक 24 हजार 396 जणांनी तर सर्वात कमी पिंपरी नगरमध्ये 1 हजार 622 जणांनी कर भरला आहे.

कोणत्याही विभागीय कार्यालयात कर भरण्याची सुविधा
मालमत्ता धारकांना कर भरण्यासाठी 17 विभागीय कार्यालये आणि ऑनलाईनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. मात्र, यापूर्वी ज्या भागात मालमत्ता आहे त्याच भागातील कार्यालयात कर भरण्याची सुविधा होती. मात्र, विभाग प्रमुख सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी प्रथमच शहरातील कोणत्याही भागातील मालमत्ता धारकांना कोणत्याही विभागीय कार्यालयात कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. उदाहरणार्थ चिंचवडची व्यक्ती तळवडे कर संकलन कार्यालयात कर भरू शकते.

करदात्यांच्या समस्यांसाठी स्वंतत्र हेल्पलाईन
शहरातील मालमत्ता धारकांना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास अशा मालमत्ता धारकांच्या समस्या सोडविण्यासाठी सारथी हेल्पलाईनवर 24 बाय 7 अशी स्वंतत्र लाईन सुरू करण्यात आली आहे. मालमत्ता धारकांना काही अडचण आल्यास हेल्पलाईनवर फोन केल्यास त्यांच्या शंकांचे निरसन केले जात आहे ‌.

गत वर्षापासून माहितीचे सुरू असलेले विश्लेषण आणि त्यावरून “data driven decision ” असा D3 ॲप्रोच ठेवण्याचे आदेश दिलेले होते. त्याचे फळस्वरुप वसुली वाढलेली दिसते. नोकरभरतीतून अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध झाल्यास विभाग अधिक सक्षम होईल. विभाग अधिकाधिक कार्यक्षम आणि लोकाभिमुख कसा होईल यावर माझा भर असणार आहे, असे  आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.

आयुक्त यांनी निरंतर जप्ती कारवाई, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि सर्वंकष मालमत्ता सर्वेक्षण ही त्रिसूत्री विभागाला आखून दिलेली आहे.  त्यानुसार आमचा विभाग झोकून काम करत आहे. आम्ही 1 हजार कोटीशिवाय थांबायचे नाही असे ठरवले आहे. पुढील संपूर्ण वर्षाचे तारखेनिहाय सूक्ष्म नियोजन तयार केल्याचे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी (PCMC) सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.