PCMC News : ‘सारथी’वरील तक्रारींकडे दुर्लक्ष पडेल महागात; आयुक्तांचा इशारा

एमपीसी न्यूज – शहरातील (PCMC News) नागरिकांना महापालिकेशी निगडीत येणाऱ्या समस्या, तक्रारी करण्यासाठी महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी सुरू केलेली सारथी हेल्पलाईन सक्षम करण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी पुढाकार घेतला आहे. यापुढे सारथीवरील तक्रारींचा वेळेत निपटारा करावा. तसेच 15 दिवसांपेक्षा जास्त एखादी तक्रार प्रलंबित ठेवल्यास तक्रार का प्रलंबित ठेवली, याची विभागप्रमुखांना कारणे द्यावी लागतील, असा इशारा सिंह यांनी दिला.
सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या, तक्रारी सोडविण्यासाठी महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या सारथी हेल्पलाइनला आलेल्या तक्रारींकडे विविध विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारींचे निवारण होत नसून सारथीवर सातत्याने तक्रारींचा ओघ वाढत आहे. तथापि, नागरिकांचा प्रशासनावर रोष निर्माण होऊ लागला आहे. सारथीवरील तक्रारींची महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी गंभीरपणे दखल घेतली आहे. ज्या विभागाचे अधिकारी सारथीवरील तक्रारींकडे दुर्लक्ष करत आहेत, अशा सर्व अधिकाऱ्यांना सिंह यांनी चांगलेच फैलावर घेतले.  15 दिवसांपेक्षा जास्त कालावधीत तक्रार प्रलंबित ठेवल्यास संबंधित विभागाला कारणे द्यावे लागणार आहेत.

महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी 15 ऑगस्ट 2013 मध्ये सारथी हेल्पलाइन सुरू केली. सारथी हेल्पलाईनचा शुभांरभ होताच राज्यासह देशातील विविध भागातील शिष्टमंडळाने सारथी हेल्पलाइनला भेट देऊन हेल्पलाइनचे मोठे कौतूक केले. मात्र, डॉ. परदेशी यांच्यानंतर आलेल्या प्रत्येक आयुक्तांनी या हेल्पलाइनकडे दुर्लक्ष केले. आयुक्त म्हणून रुजू होताच सिंह यांनी सारथी हेल्पलाइनकडे पुन्हा लक्ष देणार असल्याचे सुतोवाच केले होते. त्यानुसार त्यांनी नुकतीच पालिकेत सारथी हेल्पलाइनच्या कामकाजासंदर्भात आणि तक्रारींचा आढावा घेतला. या आढावा बैठकीत विविध विभाग आणि संबंधित अधिकारी तक्रारींकडे दुर्लक्ष करत असल्याचे त्यांच्या निदर्शास आले. किरकोळ तक्रारीही 40 ते 45 दिवस प्रलंबित असल्याचे समोर आले. त्यामुळे संतापलेल्या आयुक्त सिंह यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.
महिन्यातील पहिल्या आणि तिसऱ्या मंगळवारी (PCMC News) सारथीवरींल तक्रारींची आढावा बैठक घेण्यात येणार आहे. प्रत्येक विभागाला हेल्पलाइनवरील तक्रारी सोडविण्यासाठी जबाबदार व्यक्तीची नियुक्ती करावी लागणार आहे.  तसेच सारथी हेल्पलाइनवर तक्रार करण्यासाठी नागरिकांना यापूर्वी फक्त दीड मिनिटांचा वेळ होता. त्यामुळे एखादी मोठी तक्रार करावयाची असेल तर दिड मिनिटांत तक्रारकर्त्यांला तक्रार देण्यास अडचण येत होती. मध्येच फोन कट होत होता. त्यामुळे आता दिड मिनिटांऐवजी पाच मिनिटांचा वेळ वाढविण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.