PCMC : माहिती अधिकाराअंतर्गत माहिती देणे अधिका-यांना बंधनकारक

एमपीसी न्यूज – नागरिकांनी माहितीच्या अधिकारात ( PCMC)  मागवलेली माहिती देणे बंधनकारक असून शासकीय कर्मचा-यांनी माहिती  देताना सकारात्मक दृष्टीकोनातून  आणि विश्वस्थांच्या   भूमिकेतून कृती केली पाहिजे, असे मत यशदा संस्थेचे प्रशिक्षण व्यवस्थापक तथा संशोधन अधिकारी दादा बुले यांनी व्यक्त केले. संबंधित माहिती पुरविणे ही त्या कर्मचारी किंवा अधिकाऱ्याची जबाबदारी आहे, असेही ते म्हणाले.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कामगार कल्याण विभाग आणि यशदा यांच्या संयुक्त विद्यमाने माहिती अधिकार कायदा 2005 प्रशिक्षण शिबिराचे आयोजन चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात करण्यात आले होते यावेळी मार्गदर्शन करताना  ते बोलत होते.

Pimpri : एअर पिस्तूलमध्ये आर्या म्हस्केला सुवर्ण पदक

या प्रशिक्षणास अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप,  सहाय्यक आयुक्त सुषमा शिंदे, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी अनिता कोटलवार, माहिती व जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, उप अभियंता हरविंदरसिंग बन्सल तसेच यशदा संस्थेच्या  मुख्य प्रशिक्षक  रेखा साळुंखे आणि विविध विभागातील माहिती अधिकारी उपस्थित होते.

कार्यालयीन कामकाजात अडचणी येऊ नये यासाठी माहिती अधिकारातील काही महत्वाच्या बाबी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी समजून घेतल्या पाहिजेत, जेणेकरून त्यांना भविष्यात अडचणींचा सामना करावा लागणार नाही .

तसेच  जेव्हा कर्मचारी किंवा अधिकाऱ्याकडे सामान्य नागरिक माहिती अधिकार कायद्याच्या अंतर्गत माहिती घेण्यासाठी येतो किंवा त्याला कोणती माहिती हवी आहे, ती संबंधित माहिती पुरविणे ही त्या कर्मचारी किंवा अधिकाऱ्याची जबाबदारी आहे ,असेही अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप म्हणाले.

यावेळी मुख्य प्रशिक्षक दादू बुले यांनी माहिती अधिकार कायदा 2005 बद्दल सविस्तर माहिती सांगितली तसेच माहितीचा अधिकार कायद्याचा उद्देश हा प्रगल्भ लोकशाहीसाठी माहितगार नागरिक व नागरिकांचे समूह घडविणे, नागरिकांचा शासन कारभारातील सहभाग वाढविणे, राज्यकारभारात पारदर्शकता व खुलेपणा निर्माण करणे, शासन यंत्रणेमध्ये नागरिकांच्या प्रति उत्तरदायित्व निर्माण करणे, राज्यकारभारातील व व्यवस्थेतील भ्रष्टाचाराला आळा घालणे, माहिती मिळविण्यासाठी सुलभ  यंत्रणा उभारणे  हा आहे  असे त्यांनी सांगितले.

या शिबिरात मुख्य प्रशिक्षक रेखा साळुंखे  यांनी समुचित शासन, समुचित शासनाच्या जबाबदाऱ्या, सक्षम प्राधिकारी, सार्वजनिक प्राधिकरण अशा विविध बाबींची माहिती वेगवेगळ्या प्रत्यक्ष घडलेल्या प्रसंगानुसार  उपस्थित कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिली. शिबिराचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त सुषमा शिंदे  यांनी केले. तर, सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी ( PCMC) केले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.