PCMC: नवीन वर्षात कर भरा आणि दोन टक्के महिना दंड टाळा, पुढील तीन महिन्यांत जप्तीची मोहिम तीव्र

एमपीसी न्यूज – नागरिकांना मिळकत कर वेळेत भरता (PCMC) यावा, यासाठी मार्च 2023 अखेरपर्यंत सुट्टीच्या दिवशीही कर भरणा केंद्र सुरू ठेवण्यात येणार आहेत. नवीन वर्षाची सुरुवात कर भरून करा, दोन टक्के महिना दंड टाळा, असे आवाहन महापालिकेच्या कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांनी केले आहे. तसेच पुढील तीन महिन्यांत जप्तीची मोहीम अधिक तीव्र करण्याचा इशाराही देशमुख यांनी दिला आहे.

शहरात 5 लाख 88 हजार मिळकतींची नोंद आहे. या सर्व मिळकतींना महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत कर गोळा केला जातो. मालमत्ता धारकांना कर भरण्यासाठी ऑनलाइन सुविधांसह 17 विभागीय कार्यालयात कर भरण्याची सोय करण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षांत 545 कोटी रूपये कराचा भरणा केला आहे. 2022-23 या आर्थिक वर्षाचे कर आकारणी व कर संकलन विभागाने 1000 कोटींचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी किमान 85 टक्के मालमत्तांचा टॅक्स वसूल करणे आवश्यक आहे. (PCMC) त्यामुळे हा पल्ला गाठण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांनी कंबर कसली आहे.

Pune : वडगांवशेरी चौक ते खराडी जुना जकात नाका दरम्यान बी.आर.टी. मार्गावरील दोन्ही लेन खुल्या

पिंपरी-चिंचवड शहरातील 50 हजारांपुढे थकबाकी असणाऱ्या 26 हजार 760, पाच लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या व्यावसायिक 1 हजार 361 तर मालमत्ता कराचा एकदाही भरणा न केलेल्या 3 हजार 850 अशा 31 हजार  971 मिळकत धारकांना जप्तीच्या नोटीसा कर आकारणी व कर संकलन विभागाने दिल्या होत्या. तसेच तीन लाख निवासी मालमत्ता धारकांकडे तब्बल 583 कोटी रुपयांचा कर थकीत आहे. अशा थकबाकीदारांवर सहाय्यक आयुक्त देशमुख यांनी लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळेच आतापर्यंत साडेपाचशे कोटींचा टप्पा पार करण्यात या विभागाला यश आले आहे.

याबाबत माहिती देताना सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख म्हणाले, महापालिकेचा उत्पन्नाचा मुख्य स्रोत हा मालमत्ता कर आहे. मात्र, शहरातील तीन लाख निवासी मालमत्ता धारकांकडे तब्बल 583 कोटी रुपयांचा कर थकीत आहे. वारंवार कर भरण्याचे आवाहन करून मालमत्ताधारक कर भरत नसल्याने महापालिकेने नाईलाजाने कठोर भूमिका घेत जप्तीची मोहीम राबवली. या मोहिमेत मोठ्या प्रमाणात सदनिका, व्यावसायिक गाळे जप्त केले आहेत. त्यामुळे थकीत कर वसूल करण्यास चांगले यश येत आहे. तसेच मालमत्ता धारकांनी थकबाकी (PCMC) आणि चालू वर्षाचा कर भरून महापालिकेला सहकार्य करून शहर विकासात योगदान द्यावे, असे आवाहनही देशमुख यांनी केले.

दरम्यान, नागरिकांच्या दृष्टीने यापुढील तीन महिनेही ही सर्व कर भरणा केंद्र सुटीच्या सर्व दिवशी सुरू ठेवली जाणार असल्याचेही  देशमुख यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.