PCMC : मालमत्ता दडविणे आता अशक्‍य!

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड शहरातील मालमत्तांचे महापालिकेच्या वतीने अत्याधुनिक ड्रोनव्दारे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. (PCMC) या सर्वेक्षणामुळे मालमत्ता दडविणे अशक्‍य होणार असून नोंदी नसलेल्या नवीन मालमत्ता कर कक्षेत येण्यासाठी मोठी मदत होणार आहे.

महापालिकेचा मालमत्ता कर हा मुख्य उत्पन्नाचा स्त्रोत असून शहरात 5 लाख 97 हजार 785 मालमत्ता आहेत. शहर वाढत असताना मालमत्तांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, अनेक जण मालमत्तांची महापालिकेच्या दप्तरी नोंद करत नसल्याचे वेळोवेळी झालेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. यापूर्वी महापालिकेने 2013 मध्ये सर्वेक्षण केले असता यामध्ये सुमारे 35 हजार तर 2021 मध्ये झालेल्या सर्वेक्षणात 21 हजार नवीन मालमत्ता आढळून आल्या होत्या. मात्र, यानंतरही शहरात नोंद नसलेल्या मोठ्या मालमत्ता असण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे महापालिकेने प्रथमच अत्याधुनिक ड्रोनव्दारे सर्वेक्षण करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

Chakan : पादचारी तरुणाचा मोबाईल हिसकावला; दोघांना अटक

मालमत्ता सर्व्हेक्षण करणे, मालमत्तांचे सुधारीत कर आकारणी करणे, मालमत्ता करविभागाच्या सर्व सेवा वार्षिक पातळीवर पुरविणे यासाठी सल्लागार व सेवा पुरवठादार निवडणे यासाठी पालिकेने निविदा प्रक्रिया राबविली होती. मे स्थापत्य कंन्सलटट इंडीया प्रा. लि. या ठेकेदाराची निविदा प्राप्त झाली.(PCMC) अंतिम वाटाघाटी अंती मे स्थापत्य कंन्सलटट इंडीया प्रा. लि यांनी 47 कोटी 95 लाख 70 हजार रूपयांचे दर नव्याने सादर केला. सादर केलेले दर हे तुलनात्मकदृष्ट्‌या वाजवी असल्याने तसेच ठेकेदार मुदतीमध्ये काम करण्यास सक्षम असल्याने ही निविदा मान्य करण्यात आली. या कामाची तीन वर्षांची मुदत असणार आहे. त्यानुसार मालमत्ता सर्वेक्षणाच्या निविदेला आयुक्त सिंह यांनी स्थायी समितीमध्ये मंजुरी दिली आहे.

मालमत्तांची माहिती मिळणार एका क्‍लिकवर

या सर्वेक्षणातून मालमत्तांचे स्थळदर्शक नकाशांचे संगणकीकरण करणे, सर्वेक्षण करुन गोळा केलेली सर्व माहिती संगणकीकृत करुन डिजीटल फोटोग्राफ सह कर मुल्यांकन संगणक आज्ञावलीमध्ये एकमेकांस मालमत्ता निहाय जोडली जाणार आहे. जेणेकरुन कर आकारणी संबंधातील करपात्र क्षेत्रफळ, नकाशा, मालमत्तेचा फोटो व कर आकारणी एकत्रीतपणे संगणक आज्ञावलीद्वारा पाहता येणार आहे.

अनेक बांधकामांची नोंद नसल्याची शक्यता

शहरातील विविध भागात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. या बांधकामाच्या पालिकेकडे नोंदी नसल्याची शक्यता असून त्यांना कर आकारणी होत नाही. त्यामुळे महापालिकेचे कोट्यावधी रूपयांचे नुकसान होत आहे. ड्रोनव्दारे सर्वेक्षण होणार असल्यामुळे प्रत्येक बांधकाम सर्वेक्षणात सापडणार आहे. (PCMC) सर्वेक्षणात सापडलेल्या बांधकामाची नोंद करून कर आकारणी केली जाणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात मोठी भर पडणार आहे.

महापालिकेकडे वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून विविध प्रकारचा डाटा उपलब्ध झालेला आहे. या माहितीचे एकत्रीकरण करून नागरिकांना आवश्यक माहिती एकाच ॲप मधून कशी उपलब्ध करून देता येईल याबद्दल पालिका प्रयत्नशील आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ प्रत्येक नागरिकाला कसा देता येईल याबद्दल सर्व प्रयत्न करण्यात येत आहेत. हे मालमत्ता सर्वेक्षण या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. नागरिकांना सेवेचा लाभ देण्यासाठी निव्वळ कर संकलनच नव्हे तर इतर विभागाची माहिती या सर्वेक्षणातून घेतली जाणार असल्याचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले.

यापूर्वीही महापालिकेने शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण केले आहे. मात्र, यावेळी अत्याधुनिक पध्दतीच्या ड्रोनव्दारे मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणामुळे वाढीव मालमत्ता, वापरात बदल, नवीन मालमत्ता शोधण्यात मोठे यश येणार आहे. करमुल्यांकनातुन एकही मालमत्ता सुटणार नाही.(PCMC) मालमत्तांना नंबरींग केले जाणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात भर पडणार असल्याचे विभागाचे प्रमुख नीलेश देशमुख यांनी म्हटले आहे..

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.