PCMC : …तर रस्त्यांचा वापर अधिक सुखकर पद्धतीने करता येईल

एमपीसी न्यूज – शहरातील रस्ते अधिक सुरक्षित आणि सुलभ करण्यासाठी ( PCMC )  महापालिका नेहमीच प्रयत्नशील असते. पिंपरी-चिंचवड हे झपाट्याने विकसित होणारे शहर असून येथे जागतिक स्तरावर मान्यता प्राप्त नागरी गतिशीलता आणि रस्त्यांचा आराखडा अंमलात आणल्यास येत्या काळात नागरिकांना रस्त्यांचा वापर अधिक सुखकर पद्धतीने करता येईल, असा विश्वास आयुक्त शेखर सिंह यांनी व्यक्त केला.

पिंपरी-चिंचवड शहरातील रस्ते सुरक्षित, सर्व समावेशक आणि सुयोग्य करण्यासाठी महानगरपालिकेच्या अभियंत्यांसाठी ब्लूमबर्ग फिलान्थ्रॉपीज इनिशिएटिव्ह फॉर ग्लोबल रोड सेफ्टी (बीआयजीआरएस) अंतर्गत ग्लोबल डिझायनिंग सिटीज इनिशिएटीव्ह (जीडीसीआय) यांच्या सहकार्याने एक दिवसीय संवाद कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यशाळेस पोलीस उप आयुक्त बापू बांगर, सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल कुबडे, शहर अभियंता मकरंद निकम, पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी आणि महापालिकेतील अभियंते उपस्थित होते. तसेच ग्लोबल डिझायनिंग सिटीज इनिशिएटिव्हचे ई. डी लँकेस्टर, ज्युलिएटा जंग, जसवंत तेज कसाला यांनीही या कार्यशाळेत भाग घेतला होता.

SSC-HSC Exam : दहावी आणि बारावीच्या वार्षिक परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर

या कार्यशाळेचा उद्देश अभियंत्यांची क्षमता वाढविणे व त्यांना अधिक सक्षम करणे आणि पादचारी, सायकलस्वार आणि मोटारसायकलस्वार यांसारख्या रस्ते वापरकर्त्यांना प्राधान्य देणाऱ्या सुरक्षित आणि शाश्वत आराखडा तयार करून करून रस्त्यांची पुनर्रचना करणे हा होता. या कार्यशाळेत अभियंत्यांनी विविध रस्ते वापरकर्त्यांच्या गरजांची तसेच शहरातील रस्ते ( PCMC ) सुरक्षित करण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या संशोधित उपायांची माहिती घेतली.

कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड म्हणाले, ही कार्यशाळा पिंपरी-चिंचवडमधील रस्ते सुरक्षा सुधारण्याच्या आमच्या प्रयत्नातील महत्त्वाचे पाऊल आहे. ब्लूमबर्ग फिलान्थ्रॉपीज इनिशिएटिव्ह फॉर ग्लोबल रोड सेफ्टी आणि ग्लोबल डिझायनिंग सिटीज इनिशिएटिव्ह यांनी सहयोग केल्याचा आम्हाला आनंद होत आहे कारण ते सर्वात असुरक्षित रस्ते वापरकर्त्यांच्या संरक्षणावर विशेष भर देऊन सुरक्षित रस्ते तयार करण्याच्या आमच्या प्रयत्नात आम्हाला पाठिंबा देत आहेत.

भारतातील रस्ते हे दुचाकी, तीनचाकी तसेच चारचाकी वाहनांसाठी वाहतूक रहदारी सुनिश्चित करण्यासाठी तयार करण्यात आले आहेत. ग्लोबल डिझायनिंग सिटीज इनिशिएटिव्हचा हाच प्रयत्न आहे की, भारतातील नागरिकांना कार्यालयात, शाळेत, प्रार्थनास्थळांवर, करमणुकीसाठी, नातेवाईक किंवा मित्रांना भेटण्यासाठी जाताना सुरक्षित वाटले पाहिजे, असे ग्लोबल डिझायनिंग सिटीज इनिशिएटिव्हचे कार्यक्रम व्यवस्थापक जसवंत तेज कासला म्हणाले.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका भविष्यात प्रशासकीय प्रभागांमध्ये अभियंत्यांसाठी प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन करण्याची योजना आखत आहे. या प्रशिक्षणामुळे अभियंत्यांना सुरक्षित आणि शाश्वत रस्ते आराखड्याचे ज्ञान प्राप्त होईल तसेच पायाभूत सुविधा देण्यास आणि विविध प्रकल्प राबविण्यास मदत मिळेल. कार्यशाळेच्या समारोप सत्रात उपस्थितांनी रस्त्यांच्या आराखड्यातील आव्हानांवर तसेच रहदारी कमी करण्यास उपयुक्त ठरणाऱ्या उपायांवर ( PCMC ) चर्चा केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.