PCMC : कर संकलन विभागाचा उद्या कर संवाद; युपिक आयडी, सर्वेक्षणाची मालमत्ता धारकांना मिळणार सविस्तर माहिती

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड (PCMC) शहरातील मालमत्ता धारकांसाठी सातत्याने नव-नवीन उपक्रम राबवणाऱ्या कर संकलन व कर आकारणी विभागाचा कर संवाद दिवसेंदिवस यशस्वी होत आहे. या कर संवादमध्ये मालमत्ता धारकांचे प्रश्न ‘ऑन दी स्पाॅट’ सोडविण्यात येत आहेत. उद्या शनिवारी (दि. 23) सकाळी साडे अकरा वाजता कर संवादचे आयोजन करण्यात आले आहे. या संवादमध्ये प्रामुख्याने युपिक आयडी, मालमत्ता सर्वेक्षण, करामधील सवलत याबद्दल माहिती देण्यात येणार आहे, असे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी सांगितले आहे.

करदात्यांचे विविध प्रश्न, त्यांना करासंदर्भात येणाऱ्या अडचणी, मनातील शंकांची सोडवणूक करण्यासाठी जन संवाद सभेच्या धर्तीवर ऑनलाइन पध्दतीने ‘कर संवाद’चे आयोजन करण्यात येते. हा संवाद फेसबुक, युट्यूबच्या माध्यमातून होणार आहे. तसेच ज्यांना ऑनलाईन उपस्थित राहता येणार नाही, अशा नागरिकांनी महापालिकेमधील कर संकलन विभागाच्या कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित रहावे.

या कर संवादमध्ये पालिकेच्या वतीने सुरू असलेल्या मालमत्ता सर्वेक्षणाची आणि मालमत्तांना युपिक आयडी (युनिक प्रॉपर्टी आयडेंटिफिकेशन कोड म्हणजेच विशिष्ट मालमत्ता क्रमांक) इत्यंभूत माहिती देण्यात येणार आहे.

महापालिकेच्या सर्व सेवा तसेच शासनाचे इतर (PCMC) विभाग यांच्यात समन्वय राहण्यासाठी या युपिक आयडीचा वापर केला जाणार आहे. सध्या देशात व्यक्तीचा जसा आधार क्रमांक हा युपिक आयडी म्हणून वापरला जातो, तसाच आता मालमत्तांसाठी युपिक आयडी वापरला जाणार आहे.

त्यामुळे मालमत्तेची सर्व माहिती व मालमत्तेशी निगडित सर्व सेवा एकाच क्लिकवर उपलब्ध होणार आहेत. याचा नागरिकांना कसा फायदा होणार आहे, याबाबत सर्व माहिती देण्यात येणार आहे.

India News : दहशतवादासह गंभीर गुन्ह्यांचा आरोप असलेल्या व्यक्तींना व्यासपीठ प्रदान करु नका

कमेंट बाॅक्समध्ये आजही विचारु शकता प्रश्न

उद्याच्या कर संवाद संदर्भात कर संकलन विभागाच्या वतीने फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करण्यात आली आहे. मात्र, या ऑनलाईन कर संवादमध्ये ज्यांना उपस्थित रहाणे शक्य नसेल अशा नागरिकांनी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामच्या कमेंट बाॅक्समध्ये आपले प्रश्न आजच विचारु शकता. या प्रश्नाची उत्तरे कर संवादमध्ये देण्यात येतील.

” मालमत्ता धारकांना दर्जेदार आणि घर बसल्या कर भरण्यासह विविध सुविधा कर संकलन विभागाच्या वतीने देण्यात येत आहेत. मात्र, त्यांच्या काही अडचणी असल्यास त्या अडचणींचा कर संवादमध्ये तत्काळ निपटारा करण्यात येत आहे. या कर संवादाला शहरातील मालमत्ताधारकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. उद्याच्याही कर संवादमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.