Nigdi : निगडी येथे हातगाड्यांमुळे पादचाऱ्यांचे जीव धोक्यात

एमपीसी न्यूज : निगडी येथील (Nigdi) संत तुकाराम व्यापारी संकुल जवळील रस्त्यावर लागणाऱ्या अनधिकृत खाद्यपदार्थांच्या हातगाड्यामुळे व वाहने पार्किंगमुळे पादचार्‍यांचा जीव धोक्यात आला आहे.

पुणे – मुंबई महामार्गवरील टिळक चौकाला लागून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे संत तुकाराम व्यापारी संकुल आहे. त्याच्या शेजारूनच टिळक चौकहून भेळ चौकाकडे रस्ता जातो. या रस्त्यावर व्यापारी संकुलाबाहेर अनेक खाद्य पदार्थांच्या हातगाड्या पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत लागलेल्या असतात. या हात गाड्यावरील खाद्य पदार्थ खाण्यासाठी निगडी व आकुर्डी परिसरातील कॉलेजचे विद्यार्थी व नागरिक येत असतात. हे खवय्ये त्यांच्या दुचाकी वाहने या हातगाड्यांच्या समोर रस्त्यावर लावतात. त्यामुळे मुलांना, महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना तसेच मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांना रस्त्याच्या मधून चालावे लागते. यामुळे पादचाऱ्यांना वाहनांची धडक बसून अपघात होण्याची शक्यता आहे.

या हातगाडीवाल्यांना मनपाने टिळक चौकमधील असलेल्या मधुकर पवळे उड्डाणपूलाखाली जागा दिली होती. काही काळ ते तेथे गेले, पण परत तेथून ते मुळ जागी आले आहेत.

याबाबत प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाचे (Nigdi) उपाध्यक्ष चंद्रशेखर जोशी म्हणाले की, “हा एक निगडीमधील ज्वलंत प्रश्न आहे. हातगाडीवले व त्यांच्या ग्राहकांच्या अवैध वाहन पार्किंगमुळे पादचारी रस्त्याच्या मधून जीव मुठीत धरून चालतात. तसेच, त्यामुळे वाहतूक कोंडी देखील होते. टिळक चौकातील सिग्नल सुटला की वाहने भरधाव वेगाने येतात. त्यामुळे अपघात होऊन पादचारी गंभीर जखमी होऊ शकतात किंवा कोणाचा जीवही जाऊ शकतो.”

Kranti foundation : क्रांती फाउंडेशनच्या वतीने चिंचवड येथे किल्ले बनवा स्पर्धा

जोशी पुढे म्हणाले की, “हातगाडीवाले त्यांचे उरलेले खाद्य पदार्थ रस्त्यावरच टाकतात. त्यामुळे दुर्गंधी पसरते. तसेच, त्यामुळे भटकी कुत्री तेथे हे फेकलेले अन्न खाण्यासाठी येतात. त्यामुळे ते पादचाऱ्यांना चावू शकतात. हातगाड्यांवरील खाद्य पदार्थ खाण्यासाठी येणारे बरेच ग्राहक धूम्रपान करतात. त्यामुळे पादचाऱ्यांना प्रदूषित वायूचा त्रास सहन करावा लागतो.”

जोशी यांनी मागणी केली, की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने हौकर्स झोन निर्माण करावेत. संत तुकाराम व्यापारी संकुल जवळील अनधिकृत हातगाड्यांना हटवून त्यांना हौकर्स झोनमध्ये हलवावेत. त्यांच्याकडून कमी डिपॉजिट व भाडे आकारावे. त्यामुळे हातगाडीवाले तेथे जातील व त्यांचा व्यावसाय करतील.

या समस्येबाबत सुचेता पानसरे (‘अ’ क्षेत्रीय अधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका) यांना विचारल्यावर त्या  म्हणाल्या, की क्षेत्रीय कार्यालयामार्फत लवकरच या हातगाडीवाल्यांवर कारवाई केली जाईल व त्यांना इतरत्र हलवले जाईल. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्याच्या कडेने फूटपाथवरून चालता येईल व अपघात होणार नाहीत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.