Pimpri: आवास योजनेचा बो-हाडेवाडीतील गृहप्रकल्पाला अखेर ‘स्थायी’ची मंजुरी 

'डीपीआर' किमतीत बदल झाल्याने पुन्हा केंद्र, राज्य सरकारच्या तांत्रिक समितीची  मंजुरी घ्यावी लागणार 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत राबविल्या जाणा-या बो-हाडेवाडी येथील पंतप्रधान आवास योजनेच्या फेरसादर केलेल्या 112 कोटी रुपयांच्या निविदेला अखेर स्थायी समितीने आज (बुधवारी) मंजुरी दिली. हे काम   ठेकेदार एस. जे. कॉन्ट्रॅक्टस यांना देण्यात येणार आहे. दरम्यान, कामाचे स्वरुप  बदलल्याने डीपीआर किमतीत मोठा फेरबदल झाला आहे. त्यासाठी या गृह प्रकल्पाचा सर्वंकष प्रकल्प अहवाल (डीपीआर) नोडल एजन्सी असलेल्या म्हाडाकडे सादर करण्यात येणार असून राज्य व केंद्र सरकारच्या तांत्रिक समितीची मान्यता घ्यावी लागणार आहे. दरम्यान, विद्यमान स्थायी समिती अस्तित्वात आल्यापासून पहिल्यांदाच 116 कोटींच्या विषयाला मंजुरी देण्यात आली आहे.  

बो-हाडेवाडी येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरे बांधण्याकरिता निविदा मागविण्यात आल्या होत्या. या योजनेअंतर्गत बो-हाडेवाडी येथे 1288 घरे बांधण्यासाठी 110 कोटी 13 लाख रूपये खर्च अपेक्षित धरण्यात आला. त्यानुसार, एस. जे. कॉन्ट्रॅक्टस या ठेकेदाराने निविदा दरापेक्षा 24 कोटी 23 लाख म्हणजेच 134 कोटी 36 लाख रूपये असा इतर ठेकेदारांपेक्षा तुलनेत कमी दर सादर केला. मात्र, हा दरही जास्त असल्याने त्यांना सुधारीत दर सादर करण्यास सांगण्यात आले. त्यानुसार, त्यांनी 123 कोटी 78 लाख रूपये सुधारीत दर सादर केला.

राज्य सरकारच्या 2017-18 च्या दरसुचीतील टेस्टींग चार्जेस, आरसीसी डिझाईन, जीएसटी, सिमेंट, स्टील, आणि रॉयल्टी चार्जेससह या कामाची किंमत 121 कोटी 109 लाख रूपये इतकी येत आहे. ठेकेदाराने सादर केलेला दर 2.14 टक्के म्हणजेच 2 कोटी 59 लाख रूपये जादा येत असल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांचे मत होते. त्यानुसार मे. एस. जे. कॉन्ट्रॅक्टस या ठेकेदाराची 123 कोटी 78 लाख 37 हजार 894 रुपयांची निविदा 22 जून 2018 रोजी स्वीकारण्यात आली होती.

दरम्यान, पंतप्रधान आवास योजनेतील प्रकल्पांच्या निविदा प्रक्रियांमध्ये रिंग होत असल्याचा तसेच वाढीव दराने निविदेस मंजुरी देण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांनी केला. तसेच पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणापेक्षा पालिकेचे दर जास्त असल्याचा आरोप केला.   या आरोपांमुळे स्थायी समितीच्या 18 जुलै 2018 रोजीच्या सभेत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी हा विषय तपासून फेरसादर करावा, असा ठराव मंजुर करण्यात आला होता. त्यानुसार फेरसादर केलेला प्रस्ताव आजच्या स्थायी समिती समोर मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता.

त्यानुसार, जीप्सम प्लास्टरसाठी होणारा 11 कोटी 30 लाख रूपये खर्च वगळून 109 कोटी 88 लाख रूपये दर ठेकेदाराला कळविण्याबाबत आयुक्तांनी मान्यता दिली. त्यानुसार, ठेकेदार एस. जे. कॉन्ट्रॅक्टस यांना सुधारीत दर सादर करण्याविषयी कळविण्यात आले. त्यांनी 109 कोटी 88 लाखापेक्षा 2 कोटी 30 लाख रूपये जादा म्हणजेच 112 कोटी 19  लाख रूपये असा निविदा स्विकृत दरापेक्षा 2.10 टक्के जादा दर सादर केला. ही सुधारीत किमतीची निविदा स्विकारण्यास आयुक्त हर्डीकर यांनी मान्यता दिली होती. त्याला स्थायी समितीने मंजुरी दिली.

दरम्यान, या बदलामुळे या कामाच्या सविस्तर प्रकल्प अहवालाच्या (डीपीआर) किमतीत बदल झाला आहे. हा बदल सरकारच्या निदर्शनास आणून त्याला मान्यता घेणे गरजेचे आहे. आता 112 कोटी रुपयांच्या या गृहप्रकल्पाच्या ‘डीपीआर’ ला केंद्र व राज्य सरकारच्या तांत्रिक समितीची मंजुरी घ्यावी लागणार आहे. त्यानंतरच कामाची वर्क ऑर्डर (कार्यरंभ) आदेश दिला जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.