BNR-HDR-TOP-Mobile

Chikhali : सडलेला इलेक्ट्रिक खांब अंगावर पडल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी

एमपीसी न्यूज – महापालिकेचा सडलेला इलेक्ट्रिक खांब दुचाकीस्वाराच्या अंगावर पडला. यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. या प्रकरणात दोषी असलेल्या महापालिकेच्या पदाधिका-यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी दुचाकीस्वाराने चिखली पोलिसांकडे केली आहे.

मिराज कमरु खान (रा. मोरेवस्ती, चिखली) असे जखमी दुचाकीस्वाराने नाव आहे.

मिराज यांनी चिखली पोलिसांना याबाबत निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, ‘मिराज 14 जून रोजी सकाळी अकराच्या सुमारास कृष्णानगर पोलीस लाईन येथून दुचाकीवरून कामावर जात होते. नूतन विद्यालयाच्या बाजूला आले असता महापालिकेचा सडलेला इलेक्ट्रिक खांब मिराज यांच्या अंगावर पडला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. तसेच त्यांच्या दुचाकीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

मिराज यांना तात्काळ उपचारासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर 19 दिवस रुग्णालयात उपचार करण्यात आले. दरम्यान, त्यांच्या डाव्या पायाची शस्त्रक्रिया करण्यात आली. हाताला देखील गंभीर दुखापत झाली. मिराज त्यांच्या घरात कमावणारे एकटेच आहेत. कमावता माणूस अंथरुणाला खिळल्याने त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट आले आहे. महापालिकेकडून या प्रकरणाची कोणत्याही प्रकारे दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे फ क्षेत्रीय कार्यालयातील संबंधित जबाबदार अधिकारी, कर्मचा-यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील मिराज यांनी निवेदनात केली आहे.

HB_POST_END_FTR-A2

.