pimple saudagar News : अद्ययावत सोयीसुविधांनी युक्त राजमाता जिजाऊ उद्यान एप्रिलअखेर नागरिकांसाठी खुले!

नगरसेवक नाना काटे यांनी केली उद्यानाची पाहणी; कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना

एमपीसी न्यूज – पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन रोडवरील रोझलँड रेसिडेन्सीजवळ उभारण्यात येणाऱ्या अद्ययावत सोयीसुविधांयुक्त राजमाता जिजाऊ उद्यान एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत नागरिकांच्या सेवेत उपलब्ध होणार आहे. सध्या या उद्यानाचे काम अंतिम टप्प्यात आहे. माजी विरोधी पक्षनेते, नगरसेवक नाना काटे यांनी आज उद्यानाची पाहणी केली. तसेच अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करून हे उद्यान लवकरात लवकर नागरिकांना खुले करण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या आहेत.

नगरसेवक नाना काटे यांनी आज (सोमवारी) महापालिकेच्या उद्यान विभागाचे अधिकारी व संबंधित उद्यानाचे ठेकेदार यांच्यासह सदर उद्यानाच्या चालू कामाची पाहणी केली. यावेळी उद्यान विभागाचे कनिष्ठ अभियंता कुंभार, ठेकेदार मे. यशक असोशिएटचे प्रतीक शिरोळे, आर्किटेक्ट आदित्य ढमाले आदी उपस्थित होते.

या उद्यानासंदर्भात बोलताना नगरसेवक काटे म्हणाले की, पिंपळे सौदागर-रहाटणी परिसरातील नागरिकांसाठी सुमारे 5 एकर जागेत हे अद्ययावत उद्यान तयार करण्यात येणार आहे.

यामध्ये जॉगिंग ट्रॅक, लहान मुलांसाठी स्वतंत्र खेळाचे मैदान, कृत्रिम गिर्यारोहण भिंत, लहान मुलांच्या बालउद्यानात पालकांना बसण्यासाठी गझीबो, लेझर फाऊंटन आणि वॉटर गार्डन, लहान मुलांसाठी स्केटिंग ट्रॅक, गझीबो आणि क्रिपर पवेलियन, जेष्ठ नागरिकांसाठी ओपन जिम, स्वतंत्र मेडिटेशन सेंटर आणि योगा सेंटर असणार आहे.

तसेच ओपन लायब्ररी, परगोला आणि फ्लावर गार्डन, हँगिंग गार्डन, फ्लॉवर वॉल, टॉपरी गार्डन, श्रब मेझ, ओपन लॉन एरिया, पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, 110 चारचाकी व 150 दुचाकीसाठी पार्किंग व्यवस्था यासह अनेक अत्याधुनिक सुखसोयींयुक्त असे हे उद्यान उभारण्यात येत आहे.

यासाठी सुमारे 6 कोटी खर्च येणार आहे. हे उद्यान लवकरच नागरिकांसाठी खुले करण्यात येईल, असे आश्वासन नाना काटे यांनी यावेळी दिले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.