Pimpri: साथीच्या आजाराचे शहरात थैमान; पालिकेने तातडीने उपाययोजना कराव्यात – श्रीरंग बारणे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. साथीचे आजार रोखण्यासाठी महापालिका गांभीर्याने पहात नाही. शहारात सर्वत्र अस्वच्छता आहे. पावसाचे पाणी साचुन तयार झालेल्या डबक्यांमध्ये डासांची निर्मिती होत आहे. त्यासाठी महापालिकेने साथीचे आजार रोखण्यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाय योजना कराव्यात अशी सूचना शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिकेला केली. 

खासदार बारणे यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाची बैठक घेतली. त्यावेळी अधिका-यांना विविध सूचना त्यांनी केल्या. आयुक्त दालनात झालेल्या बैठकीला आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, आयुक्त श्रावण हार्डीकर,  मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, नगरसेवक निलेश बारणे, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, महिला संघटीका अॅड. उर्मीला काळभोर, अनंत को-हाळे, अनिता तुतारे, सरिता साने उपस्थित होते.

खासदार बारणे म्हणाले शहरात स्वाईन फल्युने कहर माजविला आहे. स्वाईन फ्ल्युने 28 जणाचे बळी घेतला आहे. स्वाईन फ्ल्यु पाठोपाठ आता डेंग्युने विळखा घातला आहे. मलेरिया, स्वाईन फ्लयु, डेंग्यु, चिकनगुनिया या सारख्या साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यात डेंग्युची लागन झालेले 103 तर 1261 संशयीत रूग्ण आढळले आहेत. सध्या रूग्णालयात तुंबुन गर्दी पहायला मिळत आहे. महापालिकेच्या वाय सीएमएच्‌ व इतर रूग्णालयात रूग्णांना जागा उपलब्ध होत नाही. खासगी रूग्णालय देखील तुडुंब भरले आहेत. एकुणच शहरातील नागरिकांची भयभीत स्थिती झाली आहे.

शहरात साथीच्या आजाराने थैमान घातले असून महापालिकेच्या एक अधिका-याच्या यामध्ये मृत्यू झाला असतानाही महापालिका ही बाब गार्भीयाने घेत नाही. साथीच्या आजाराला आळा घालण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करणे आवश्यक आहे. स्वच्छते बरोबरच डासाचे व डेंग्युचे डास निर्माण होणारे केंद्र नष्ट केली पाहिजेत. शहरामध्ये औषधाच्या फवारणी सर्वत्र करून पावसाचे पाणी साचून डबकी तयार झाली आहेत. त्यामुळे डासांची निर्मिती होत आहे. नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर नाल्याचे पाणी थेट जात असल्याने नदी पात्राला गटारीचे स्वरूप आले आहे. नदी पात्रातही मोठ्या प्रमाणावर डास निर्मिती होत आहे.

महापालिकेने औषध फवारनी करावी, औषधाचा साठा मुबलक प्रमाणात ठेवण्यात यावा. गरीब रूग्णांसाठी महापालिकेच्या सर्व रूग्णालयात सोय उपलब्ध करून द्यावी. तसेच खासगी रूग्णालयात पेशंन्टची होत असलेली लुट थांबवण्यासाठी जिल्हाधिका-यांच्या उपस्थितीत बैठक घेवून कमी उत्पन्न गटातील नागरिकांना जागा उपलब्ध करून देण्यात यावी. त्यांना कमी खर्चात उपचार होण्यासाठी मदत करण्याच्या सूचना खासदार  बारणे यांनी अधिका-यांना दिल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.