Pimpri: चार दफनभूमींसाठी 16 काळजीवाहक, तीन वर्षासाठी एक कोटीचा खर्च

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील चार दफनभूमीच्या ठिकाणी १६ काळजीवाहक पुरविण्यात येणार आहेत. शहरातील चार धार्मिक संस्थांना हे काळजीवाहक पुरविण्याचे काम देण्यात येणार आहे. त्यासाठी तीन वर्षाकरिता एक कोटी रूपये खर्च होणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात 36 स्मशानभूमी आणि 5 धार्मिक दफनभूमी आहेत. या प्रत्येक ठिकाणी 24 तासासाठी प्रत्येकी चार काळजीवाहक ठेकेदारी पद्धतीने पुरविण्यात येतात. हे काळजीवाहक पुरविण्याचे कामकाज वैद्यकीय विभागामार्फत केले जाते. शहरातील एक लिंगायत, एक खिश्चन आणि आठ मुस्लिम अशा दहा दफनभूमींमध्ये काळजीवाहक पुरविणे, दैनंदिन साफसफाई करणे दफनभूमीच्या आतील परिसराची देखभाल दुरूस्ती करणे या तीन वर्षे कालावधीच्या कामांसाठी अर्ज मागविण्यात आले होते.

चार दफनभूमीसाठी चार संस्था पात्र ठरल्या. त्यामध्ये नेहरूनगर येथील मुस्लिम दफनभूमीसाठी पिंपरी – चिंचवड मुस्लिम वेल्फेअर अ‍ॅण्उ ईदगाह कमिटी यांचा, चिंचवड – लिंकरोड येथील मुस्लिम दफनभूमीत पिंपरी – चिंचवड मुस्लीम विकास परिषद यांची, लिंकरोड येथील खिश्चन दफनभूमीत संयुक्त खिस्ती सेवा महासंघ आणि मोरवाडीतील लिंगायत दफनभूमीमध्ये मल्लिकार्जुन प्रतिष्ठान यांच्यातर्फे काळजीवाहक नेमण्यात येणार आहेत.

किमान वेतन दराने भविष्यात त्यामध्ये होणा-या वाढीसह चार दफनभूमीसाठी प्रत्येकी चार काळजीवाहक याप्रमाणे एकूण 16 काळजीवाहकांसाठी तीन वर्षाकरिता अंदाजे 99 लाख 10 हजार रूपये खर्च होणार आहे. त्यानुसार, या चारही धार्मिक संस्थांसमवेत करारनामा करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.