Pimpri: ‘त्या’ 43 कर्मचाऱ्यांनी तत्काळ महापालिका सेवेत रुजू व्हावे, अन्यथा पगार नाही’

आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा इशारा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका आस्थापनेवरील 43 कर्मचारी सध्या निवडणूक, सरकारी तसेच इतर निमसरकारी कार्यालयात नेमणुकीस आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांनी तत्काळ महापालिका प्रशासन विभागात रुजू व्हावे, असा आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिला आहे. तसेच या कर्मचाऱ्यांचे डिसेंबर महिन्याचे वेतन महापालिका सेवेत रुजू झाल्याशिवाय देण्यात येऊ नये, असेही त्यांनी निर्देश दिले आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिका आस्थापनेवर कार्यरत असणारे काही कर्मचारी अन्य सरकारी कार्यालयांमध्ये काम करत आहेत. अशा कर्मचा-यांची माहिती महापालिकेने मागविली होती. त्यामध्ये महापालिका आस्थापनावरील 43 कर्मचारी इतर शासकीय कार्यालयात कार्यरत असल्याचे समोर आले. बहुतांशी महापालिका कर्मचा-यांच्या नियुक्त्या संबधित निवडणूक कार्यालयामार्फत तसेच प्रशासन विभागाकडील आदेशानुसार निवडणूक विभाग आणि अन्य सरकारी कार्यालयांमध्ये करण्यात आल्या आहेत. अशा कर्मचा-यांचे मासिक वेतन महापालिका कोषागारातून दिले जाते.

महापालिका प्रादेशिक कार्यक्षेत्राचा विस्तार व वाढलेल्या प्रशासकीय कामकाजाचा व्याप विचारात घेऊन सद्यस्थितीत आठ क्षेत्रीय कार्यालये कार्यान्वित आहेत. नागरिकांची आणि प्रशासकीय कामे जलदगतीने होण्यासाठी महापालिका आस्थापनेवर कर्मचारी पुरेसे नाहीत. याशिवाय महापालिकेमध्ये नोकरभरतीसाठी असलेले सरकारचे निर्बंध, गेल्या चार-पाच वर्षात महापालिका आस्थापनेवरील अधिकारी-कर्मचा-यांच्या संख्येमध्ये सेवानिवृत्ती, राजीनामा, मृत आणि इतर कारणांमुळे लक्षणीय घट झाली आहे.

त्यामुळे महापालिकेच्या सर्वच विभागांकडून लिपिक आणि अन्य संवर्गातील कर्मचा-यांची सातत्याने मागणी होत आहे. सद्यस्थितीत नोकर भरतीवरील सरकारचे निर्बंध विचारात घेता महापालिका आस्थापनेवरील उपलब्ध अधिकारी, कर्मचा-यांकडून प्रशासकीय, तांत्रिक आणि अत्यावश्यक सेवेचे कामकाज करून घेताना अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे अधिका-यांना पदाधिकारी, नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागत आहे.

अन्य सरकारी कार्यालये आणि निवडणूक कार्यालयांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचा-यांमुळे महापालिका कामकाजाचे व्यवस्थापन करताना अडचणीचे ठरते. त्यामुळे अशी कामे अन्य समकक्ष कर्मचा-यांमार्फत करावी लागतात. ही बाब प्रशासकीयदृष्ट्या योग्य नाही. विधानसभा निवडणूक 2019 चे कामकाज संपुष्टात आल्याने महापालिका कर्मचा-यांनी त्यांच्या मूळ विभागात रुजू होणे आवश्यक आहे.

या सर्व कर्मचाऱ्यांनी तत्काळ महापालिका प्रशासन विभागात रुजू व्हावे. जे कर्मचारी महापालिकेत रुजू होणार नाहीत अथवा महापालिका प्रशासन विभागात रुजू न होता विनापरवाना गैरहजर राहणे, परस्पर रजेवर राहणे, अन्य सरकारी कार्यालयातील नेमणूक कायम ठेवण्यासाठी बाह्य दबाव आणणे अशा प्रकारची कृती केल्यास ही कृती महाराष्ट्र नागरी सेवा नियमाचा भंग करणारी ठरविण्यात येईल.

त्यांच्यावर योग्य ती शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल. या कर्मचा-यांचे डिसेंबर 2019  चे मासिक वेतन महापालिका सेवेत रुजू झाल्याशिवाय देण्यात येऊ नये. हे आदेश सर्व संबंधित विभागप्रमुख किंवा नियंत्रण अधिकारी यांनी संबंधित कर्मचा-यांना तत्काळ बजवावेत, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.