Pimpri : ‘सारथी’वरील तक्रारींकडे दुर्लक्ष करणा-या अधिका-यांना आयुक्तांचा दणका, दंडात्मक कारवाई

एमपीसी न्यूज – ‘सारथी हेल्प लाईन’वरील तक्रारींकडे दुर्लक्ष करणा-या महापालिकेतील अधिका-यांना आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी चांगलाच दणका दिला आहे. सारथीवरील तक्रारी पेंडींग ठेवणा-या दहा अधिका-यांवर दंडात्मक कारवाई केली आहे. त्यामध्ये शहर अभियंता, उपशहर अभियंता, सह शहर अभियंता, कार्यकारी अभियंता, सहाय्यक आयुक्त, आरोग्य, आरोग्य कार्यकारी, पशुवैद्यकीय अधिकारी, नगररचना उपसंचालक यांचा समावेश आहे. तसेच यापुढे सारथीवरील तक्रारी मुदतीत निकाली काढण्याची सक्त ताकीद दिली आहे.

सर्वाधिक 409 तक्रारी पशुवैद्यकीय विभागाकडे प्रलंबित होत्या. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे 409 तक्रारी प्रलंबित, उपशहर अभियंता रामदास तांबे 11 तक्रारी प्रलंबित, शहर अभियंता राजन पाटील यांनी 6 तक्रारी प्रलंबित ठेवल्या असून तिघांनाही प्रत्येकी 500 रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. तर, कार्यकारी अभियंता देवन्ना गट्टूवार यांनी 3 तक्रारी, सह शहर अभियंता श्रीकांत सवणे यांनी 2, नगररचना विभागाचे उपसंचालक राजेंद्र पवार यांनी 3, कार्यकारी अभियंता विजयकुमार काळे यांनी 3, आरोग्य कार्यकारी अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी 2, सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे यांनी 2, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी 2 तक्रारी प्रलंबित ठेवल्या असून सर्वांना प्रत्येकी 250 रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.

आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी बुधवारी (दि. 18) विभागप्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीत सारथी हेल्पलाईनवरील दाखल तक्रारींचा आढावा घेण्यात आला. सारथीवरील बहुतांशी विभागाच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्रलंबित असल्याचे आयुक्तांच्या निर्दशनास आले. सारथीवरील तक्रारी वेळीच मुदतीमध्ये निकाली काढण्याच्या वेळोवेळी सूचना दिल्या असतानाही दहा विभागातील तक्रारी मूदतपुर्व प्रलंबित राहिल्या आहेत. ही बाब कार्यालयीन शिस्तीची भंग करणारी आहे.

आढावा बैठकीत तक्रारी निकाली काढण्याबाबत वेळोवेळी सूचना देऊनही अधिका-यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. कार्यालयीन शिस्तीचे उल्लंघन केले. त्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यापुढे सारथी प्रणालीवरील तक्रारी मुदतीत निकाली काढण्याची सक्त ताकीद देण्यात आली आहे. अन्यथा जबर शास्तीची कारवाई करण्याचा इशारा आयुक्त हर्डीकर यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.