Pimpri: सातव्या वेतन आयोगानुसार कर्मचा-यांना दोन महिन्यांनी मिळणार पगार

वेतन निश्चितीचे काम सुरु, आयुक्त श्रावण हर्डीकर यांची माहिती

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचा-यांना सातवा वेतन आयोगानुसार सुधारीत वेतनश्रेणी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकारच्या अटींची पडताळणी केली जात आहे. त्याची प्रक्रिया मोठी आहे. त्या प्रक्रियेनुसार वेनतवाढ निश्चितीचे काम सुरु आहे. त्याकरिता दोन महिन्यांचा कालावधी लागेल. त्यानंतर सातव्या वेतन आयोगानुसार कर्मचा-यांना पगार मिळेल, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. तसेच वेतनाचा फरक चार टप्प्यात देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यातील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाविकास आघाडी सरकारने महापालिकेतील सातव्या वेतन आयोगाचा रखडलेला प्रश्न मार्गी लावला आहे. महापालिका कर्मचा-यांना सातवा वेतन आयोगानुसार सुधारीत वेतनश्रेणी देण्यास 21 डिसेंबर 2019 रोजी मान्यता दिली आहे. यामुळे महापालिकेतील 7 हजार 955 कर्मचा-यांसह शिक्षण समितीतील 1 हजार 47 कर्मचा-यांच्या पगारात घसघशीत वाढ होणार आहे.

महापालिकेचा आस्थापना खर्च दरमहा आठ कोटींनी तर वार्षिक 96 कोटींनी वाढणार आहे. 2016 पासूनच्या वेतन फरकाची रक्कमही देण्यात येणार आहे. ‘अ’ वर्ग कर्मचा-यांचे वेतन हे 23 हजांरानी तर वर्ग दोनचे वेतन 21 हजार रूपयांनी, वर्ग तीनचे वेतन 17 हजार रूपयांनी आणि वर्ग चारच्या कर्मचा-यांचे वेतन 10 हजार रूपयांनी वाढेल.

याबाबत बोलताना आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ”सातवा वेतन आयोग लागू करण्याची प्रक्रिया सुरु आहे. सरकारच्या अटींची पडताळणी केली जात आहे. प्रक्रिया पुर्ण करुन वेतनवाढ निश्चित करावी लागणार आहे. त्याचे काम सुरु आहे. ही प्रक्रिया मोठी असल्याने त्याला दोन महिन्याचा कालावधी लागू शकतो. वेतनवाढ निश्चितीचे काम पुर्ण झाल्यानंतर सातव्या वेतन आयोगानुसार कर्मचा-यांना पगार मिळेल. वेतनाचा फरक चार टप्प्यात दिला जाणार आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.