Pimpri: ‘डेडलाईन’ उद्या संपणार ! आता दररोज की दिवसाआडच पाणीपुरवठा ?

एमपीसी न्यूज – पवना धरणात 100 टक्के पाणीसाठा असतानाही समन्यायी पाणी वाटपाचे कारण देत पिंपरी-चिंचवड महापालिकेने 25 नोव्हेंबर 2019 पासून दोन महिन्यासाठी केलेल्या एक दिवसाआड पाणीपुरवठ्याची मुदत उद्या (शनिवारी) संपणार आहे. त्यामुळे एक दिवसाआड पाणी कपात मागे घेऊन दररोज पाणीपुरवठा केला जाणार का? याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

मावळातील पवना धरणातून पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविली जाते. यंदा पवना धरण क्षेत्रात चांगला पाऊस पडला. त्यामुळे पवना धरण तीनवेळा 100 टक्के भरले होते. धरणात पाणी असूनही नागरिकांना पाणी मिळत नव्हते. पाण्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली होती. शहराच्या अनेक भागात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे धरणात 100 टक्के पाणीसाठा असतानाही पाणीपुरवठा विभागाच्या नियोजनाअभावी शहरवासीयांना हिवाळ्यातच पाणी टंचाईला सामोरे जावे लागले होते.

महापालिकेने 25 नोव्हेंबर 2019 पासून एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला होता. पाण्याची टंचाई नसून समन्यायी पाणी वाटपासाठी एकदिवसाआड पाणीपुरवठा केला आहे. दोन महिन्यांसाठीच एकदिवसाआड पाणीपुरवठा केल्याचे प्रशासनाने सांगितले होते. दोन महिन्यात अनधिकृत नळजोड, मोटारी जप्त करुन सुसुत्रता आणाली जाणार होती.

एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरु असल्याने पाण्याच्या तक्रारींचे प्रमाण कमी झाले आहे. परंतु, धरणात जुलै 2020 पर्यंत पुरेल एवढा मुबलक पाणीसाठा असतानाही शहरवासीयांना एक दिवसाआड पाणी मिळत आहे. एक दिवसाआड पाणीकपातीची दोन महिन्याची मुदत उद्या (शनिवारी) संपणार असून पाणी कपात मागे घेऊन दररोज पाणीपुरवठा केला जाणार का याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

याबाबत बोलताना पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता मकरंद निकम म्हणाले, ”दोन महिन्यासाठी एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला होता. एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरु केल्याने तक्रारींचे प्रमाण कमी झाले. नागरिकांना जादा दाबाने पाणी दिले जात आहे. दोन महिन्याची मुदत शनिवारी संपणार आहे. आयुक्तांसोबत बैठक होईल. दोन महिन्यातील आढावा घेतला जाईल. किती तक्रारी आल्या, कोणत्या भागातून आल्या याची सविस्तर माहिती आयुक्तांना दिली जाईल. त्यानंतर एकदिवसाआड पाणीपुरवठा कायम ठेवायचा की दररोज पाणीपुरवठा करायचा याबाबतचा निर्णय घेतला जाईल. जादा लागणारे 30 एमएलडी पाणी उपलब्ध झाले नाही”, असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like