Pimpri : अण्णा बनसोडे यांनी खराळवाडी, गांधीनगर भाग काढला पिंजून; पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – पिंपरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस- कॉंग्रेस मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार माजी आमदार अण्णा बनसोडे यांनी आज खराळवाडी, गांधीनगर भागात पदयात्रा काढून अवघा भाग पिंजून काढला. या पदयात्रेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ठिकठिकाणी महिला भगिनींनी बनसोडे यांचे औक्षण करून त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या.

या पदयात्रेत पिंपरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस- कॉंग्रेस मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार माजी आमदार अण्णा बनसोडे यांच्यासह माजी महापौर डॉ. वैशाली घोडेकर, नगरसेवक राहुल भोसले, समीर मासुळकर, माजी उपमहापौर विश्रांती पाडाळे तसेच अनिल यादव, लखन काकडे, निखिल कलापुरे, संतोष भागवत आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

यावेळी माजी महापौर व विद्यमान नगरसेविका डॉ. वैशाली घोडेकर म्हणाल्या की, पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. झोपडपट्टी पुनर्वसनाच्या दृष्टीने प्रयत्न अपुरे पडत आहेत. शहराचा विकास मंदावला आहे. राष्ट्रवादीच्या काळात शहर सुशोभिकरणाचे काम मोठ्या प्रमाणात झाले त्यामुळे शहराचे रंगरूप पालटले. आज त्या दिशेने प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यामुळे पिंपरीचा ख-या अर्थाने विकास करायचा असेल तर मतदारांनी पिंपरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस- कॉंग्रेस मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार माजी आमदार अण्णा बनसोडे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन डॉ. घोडेकर यांनी केले.

यावेळी माजी आमदार अण्णा बनसोडे यांनी पदयात्रेच्या निमित्ताने मतदारांशी संपर्क साधला आणि मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचे अभिवचन दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.