Pimpri: महापालिकेत एक उपायुक्त, दोन प्रशासन अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्तीवर नियुक्ती

Pimpri: Appointment of one Deputy Commissioner, two administrative officers on deputation महापालिकेत पहिल्यांदाच उपायुक्त पदाची निर्मिची झाली असून इंगळे हे पहिले उपायुक्त ठरले आहेत.

एमपीसी न्यूज- मुंबई मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव सुभाष इंगळे यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेत ‘उपायुक्त’पदी प्रतिनियुक्तीवर नियुक्ती झाली आहे. महापालिकेत पहिल्यांदाच उपायुक्त पदाची निर्मिती झाली असून इंगळे हे पहिले उपायुक्त ठरले आहेत. तसेच सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास गावडे आणि सातारा जिल्ह्यातील म्हसवड नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी चेतना केरुरे यांची प्रशासन अधिकारी म्हणून पालिकेत प्रतिनियुक्तीवर नियुक्ती झाली आहे.

राज्य सरकारने 1 सप्टेंबर 2014 रोजी पिंपरी महापालिकेचा समावेश ‘ब’ वर्गामध्ये केला. ‘ब’ वर्गात समावेश झाल्यामुळे महापालिकेचा नवा आकृतीबंध, सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण नियम तयार केले आहेत.

महापालिकेच्या आकृतिबंधाला मंजुरी मिळाली आहे. नवीन आकृतीबंधानुसार महापालिकेत तीन अतिरिक्त आयुक्त, सात उपायुक्त आणि सात सहशहर अभियंता, 26 कार्यकारी अभियंता पदे आहेत. त्यामुळे महापालिकेत आता उपायुक्त देखील असणार आहेत.

पण, राज्यसेवेतील किती आणि पालिका सेवेतील किती उपायुक्त असतील याचा कोटा निश्चित झाला नाही. सहाय्यक आयुक्तांनंतर उपायुक्तांचे पद असणार आहे.

मुंबई मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव सुभाष इंगळे यांची पालिकेत उपायुक्तपदी प्रतिनियुक्तीवर नियुक्ती झाली आहे. त्यांची बदली 29 जून रोजी झाली होती. मंगळवारी (दि.7) ते महापालिकेत रुजू झाले आहेत. इंगळे पहिले ‘उपायुक्त’ असणार आहेत.

याशिवाय सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास गावडे आणि सातारा जिल्ह्यातील म्हसवड नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी चेतना केरुरे यांची प्रशासन अधिकारी म्हणून पालिकेत प्रतिनियुक्तीवर नियुक्ती झाली आहे.

कोरोना विषाणू संसर्ग नियंत्रणाच्या कामकाजाचे गांभीर्य व निकड विचारात घेऊन आणि त्याबाबतच्या उपायोजनांचा भाग म्हणून त्यांची पालिकेत बदली केली असल्याचे अवर सचिव सचिन सहस्त्रबुद्धे यांनी आदेशात म्हटले आहे.

दरम्यान, महापालिकेत आता वरिष्ठ अधिका-यांची कमतरता राहिली नाही. राज्य सेवेतील संतोष पाटील, अजित पवार आणि महापालिका सेवेतील प्रवीण तुपे असे तीन अतिरिक्त आयुक्त कार्यरत आहेत.

तर राज्य सेवेतील ‘सीईओ’ केडरचे भांडार विभागाचे मंगेश चितळे, कर संकलन विभागाच्या स्मिता झगडे, झोपडपट्टी पुनर्वसन विभागाचे सुनील अलमेलकर, आकाश चिन्ह परवाना विभागाचे बाळासाहेब खांडेकर, भुमी आणि जिंदगी विभागाचे प्रशांत जोशी आणि महापालिका सेवेतील प्रशासन विभागाचे मनोज लोणकर, क्रीडा विभागाचे संदीप खोत, सुरक्षा विभागाच्या आशादेवी दुरगुडे, ‘अ’ प्रभागाचे क्षेत्रिय अधिकारी चंद्रकांत इंदलकर, ‘क’ प्रभागाचे अण्णा बोदडे असे पाच एकूण दहा सहाय्यक आयुक्त कार्यरत आहेत.

शिवाय राज्य सेवेतील दोन प्रशासन अधिकारी देखील पालिकेत रुजू होणार आहेत. यामुळे वरिष्ठ अधिका-यांची कोणतीही कमतरता नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.