Pimpri: लक्षणेविरहित रुग्णांची ‘होम आयसोलेट’ला पसंती, सध्या 1700 रुग्ण होम आयसोलेट

घरीच उपचार घेऊन 7 हजार 555 रुग्ण झाले बरे : Asymptomatic patients prefer 'home isolate', currently 1700 patients prefer home isolate

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने बेडची कमतरता भासत आहे. पण, त्यात दिलासादायक बाब म्हणजे अनेक लक्षणे विरहित आणि सोय असलेले रुग्ण स्वत:हून ‘होम आयसोलेट’ होत आहेत.  आजपर्यंत बाधित झालेल्या 25 हजार रुग्णांपैकी 9 हजार रुग्णांनी घरीच उपचार घेतले. त्यातील 7 हजार 555 रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत. सध्या 1700 रुग्ण होम आयसोलेट असून त्यामध्ये दररोज वाढ होत आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. शहरातील रुग्णसंख्या 25 हजार पार झाली आहे. त्यापैकी 17,647 बरे होऊन घरी गेले आहेत. तर, 6765 सक्रिय रुग्ण आहेत.

435 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 15 ऑगस्टपर्यंत रुग्णसंख्या 50 हजार होण्याचा अंदाज आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केला आहे.

पालिकेकडून लक्षणे विरहित रुग्णांसाठी कोविड केअर सेंटर तयार केले आहे. लक्षणे असलेल्या रुग्णांवर वायसीएम, भोसरी, खासगी रुग्णालयात उपचार केले जात आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमध्ये श्वास घेण्याचा त्रास होणा-या रुग्णांची वाढ होत आहे. त्यामुळे ऑक्सिजनयुक्त बेडची निर्मिती युद्धपातळीवर केली जात आहे.

बाधित रुग्णांमध्ये कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह पण लक्षणे काहीच नाहीत अशा रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. या रुग्णांनी घरीच होम आयसोलेट होण्याचे आवाहन पालिकेने केले होते. त्याला रुग्णांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.  यामुळे श्वासनाचा त्रास, गंभीर रुग्णांना बेड उपलब्ध होण्यास मदत होते.

एखादा रुग्ण पॉझिटीव्ह आल्यानंतर त्याला लक्षणे कशी आहेत. त्याची प्रकृती घरी ठेवण्यायोग्य असेल, लक्षणेविरहित असेल, रुग्ण घरी राहून औषधोपचार घेऊन बरा होऊ शकतो, असे डॉक्टरांना वाटले. तसेच  रुग्णाची परवानगी असेल, रुग्णाच्या घरी स्वतंत्र रुम, स्वच्छतागृह, काळजी घेण्यासाठी स्वतंत्र व्यक्ती (केअर टेकर) असेल तरच रुग्णांना ‘होम आयसोलेट’ची परवानी दिली जाते.

ही सोय नसेल्या रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले जाते. झोपडपट्टीत राहणा-या रुग्णांना होम आयसोलेट केले जात नाही.  एखाद्या  रुग्णाची सोय असूनही होम आयसोलेट होण्याची इच्छा नसल्यास त्याला सीसीसी सेंटरमध्ये ठेवले जाते.

होम आयसोलेट असलेल्या रुग्णांची नावासह माहिती पालिकेकडे असते. होम आयसोलेट असलेल्या रुग्णांची पालिका योग्य ती काळजी घेते. पहिले दहा दिवस पालिकेच्या वॉर रुम, कॉल सेंटरमधून रुग्णाला दररोज फोन केले जातात. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली जाते.

लक्षणे आहेत का, ताप, खोकला, श्वास घ्यायला अडचण येत आहे का, हे विचारले जाते. रुग्णाला त्रास होत असल्यास रुग्णवाहिका पाठवून पुढील उपचारासाठी रुग्णालयात आणले जाते.

दहा दिवसानंतर काही त्रास होत असल्यास, अडचण आल्यास रुग्णाने स्वत: फोन करुन पालिकेला सांगणे आवश्यक आहे. होम आयसोलेट रुग्ण राहत असलेल्या इमारतीच्या प्रवेशद्वावर कोविड रुग्ण असल्याचा फलक लावला जातो. पालिकेच्या आरोग्य विभागाकडून तो परिसर सॅनिटाईझ केला जातो.

आजपर्यंत बाधित झालेल्या 25 हजार रुग्णांपैकी आत्तापर्यंत तब्बल 9 हजार रुग्ण होम आयसोलेट झाले होते. त्यातील दहा दिवस पूर्ण झालेले 3170 रुग्ण पॅसिव्ह होम आयसोलेशन आहेत.

काही त्रास होत असेल तर या रुग्णांनी स्वत:हून पालिकेला सांगणे आवश्यक असते. तर होम आयसोलेशन पूर्ण झालेले 4385 रुग्ण आहेत. 7 हजार 555 रुग्णांचे आयसोलेशन पूर्ण झाले आहे. ते घरी उपचार घेऊन ठणठणीत झाले आहेत. आज 1700 रुग्ण होम आयसोलेट आहेत. या रुग्णसंख्येत दररोज वाढ होते.

याबाबत  अधिक माहिती देताना अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील म्हणाले, ”शहरातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता लक्षणे विरहित आणि घरी सोय असलेल्या रुग्णांना होम आयसोलेट होण्याचे आवाहन केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आजपर्यंत 9 हजार रुग्णांना होम आयसोलेटची परवानगी दिली होती. त्यातील 7 हजार 555 रुग्णांचे आयसोलेशन पूर्ण झाले आहे. होम आयसोलेट रुग्णांची योग्य ती काळजी घेतली जाते. लक्षणे विरहित रुग्ण होम आयसोलेट असल्याने लक्षणे असलेल्या रुग्णांना बेड उपलब्ध होत आहेत. श्वासनाचा त्रास होणा-या रुग्णांसाठी बेडची उपलब्धता होण्यास मदत होते. ज्या रुग्णाला बेडची आवश्यकता आहे. त्याला बेड मिळण्यास मोठी मदत होते”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.