Pimpri: भाजपला आंदोलनाचा नैतिक अधिकार नाही ; राष्ट्रवादीची टीका

एमपीसी न्यूज – संपूर्ण महाराष्ट्र आणि पिंपरी-चिंचवड शहर कोरोनामुळे अडचणीत आलेले असताना भाजप आमदार, नगरसेवकांनी आपले मानधन मुख्यमंत्री निधीला देण्याऐवजी पंतप्रधान निधीला देऊन महाराष्ट्राशी आणि पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांशी द्रोह केला आहे. अडचणीत असलेल्या शहरातील जनतेला मदत केली नाही. त्यामुळे भाजपने राज्य शासनाविरोधात आंदोलन करण्याचा नैतिक अधिकार गमाविला असल्याची टीका  राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.

भाजपकडून उद्या (शुक्रवारी) महाराष्ट्र बचाव हे आंदोलन हाती घेण्यात आले आहे. त्यावर राष्ट्रवादीने आज (गुरुवारी) पत्रकार परिषद घेऊन भाजप नेत्यांवर टीकास्त्र सोडले.  शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने, महिला शहराध्यक्ष वैशाली काळभोर, प्रशांत शितोळे, जावेद शेख, पंकज भालेकर, सुलक्षणा शिलवंत, युवकचे अध्यक्ष विशाल वाकडकर, सुनील गव्हाणे यावेळी उपस्थित होते.

महाराष्ट्र बचाव आंदोलनाच्या आडून आपल्या बगलबच्च्यांना सांभाळण्यासाठी आंदोलनाची नौटंकी भाजपाकडून करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील जनता सुज्ञ असून भाजपाला जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही, असे सांगत शहराध्यक्ष वाघेरे म्हणाले,  भाजपाने जे आंदोलन हाती घेतले आहे. तेच मुळत: हास्यास्पद आहे.

संपूर्ण राज्य करोनामुळे हैराण आहे. महाविकास आघाडीच्या सरकारकडून करोना आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासह मंत्रीमंडळातील सर्व मंत्री करोना आटोक्यात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत.

आतापर्यंत 11 हजारांहून अधिक नागरिक बरे होऊन घरी गेले आहेत. मोफत अन्नधान्य, क्वारंटाईन नागरिकांना सुविधा देण्याबरोबरच आरोग्य व वैद्यकीय सुविधा प्रत्येक व्यक्तीपर्यंत उपलब्ध करून दिल्या जात आहेत. राज्यातील आरोग्य, वैद्यकीय आणि अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेले लाखो कर्मचारी अहोरात्र मेहनत करीत आहे. मात्र, भाजपाच्या नेत्यांना यामध्येही राजकारण सुचते ही बाबच दुर्देवी आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये भ्रष्टाचाराला ऊत

पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिकांमध्ये भाजपाची सत्ता आहे. या दोन्ही ठिकाणी कोरोनाच्या नावाखाली भाजपाच्या नेत्यांनी केवळ भ्रष्टाचार आणि महापालिकांची लूट चालविली आहे. शासनाकडून आलेल्या धान्यातून जेवणाचे वाटप झाले.  मात्र, भाजपाचे स्थानिक नेते त्यावरही स्वत:चे लेबल लावून राजकारण करीत आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेने कोरोनाच्या नावाखाली खरेदी करून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार  केला आहे, असा आरोपही वाघेरे यांनी केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.