Pimpri: कोरोनाचे निदान अर्ध्या तासात करणाऱ्या अँटीजेन टेस्टिंग कीट खरेदी करा – भाऊसाहेब भोईर

Buy an antigen testing kit that diagnoses corona in half an hour - Bhausaheb Bhoir

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात कोरोना साथ आटोक्यात आण्यासाठी कठोर उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी कोरोनाचे अर्ध्या तासात निदान करणाऱ्या अँटीजेन टेस्टिंग कीट खरेदी कराव्यात. कमीत कमी 1 लाख अँटीजेन टेस्टिंग कीट खरेदी करण्याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे स्वीकृत नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी महापालिकेकडे केली आहे.

भोईर यांनी म्हटले आहे की, कोरोना विषाणूची साथ महानगरपालिका क्षेत्रात थैमान घालत आहे. सध्य परिस्थितीत शहरात बाधितांचा आकडा 3277 झाला आहे. यातील बहुतेक रुग्ण बरे झाले आहेत. तर, 47 रुग्णांचा दुर्दैवी अंत झाला आहे. शहरात दररोज 100 च्या आसपास करोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत.

ज्या ठिकाणी करोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्या ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्रे तयार केली जात आहेत. पालिका प्रशासन राज्य सरकारने लॉकडाऊन संबंधित घालून दिलेल्या वेगवेगळ्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करत आहेत.

सार्वजनिक स्वच्छता,वैयक्तिक काळजी आणि सामाजिक अंतरासारख्या उपाययोजनांचे नागरिक पालन करताना दिसत आहे. यामुळे करोना साथीला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सर्व स्तरांवर चालू असण्याचे दिसून येत आहे.

परंतु, आपल्या महापालिका क्षेत्रातील कोरोना विषाणूसंबंधी तपासण्या वाढविण्याची नितांत गरज आहे. उपलब्ध माहितीनुसार कोरोना चाचणीचा निकाल येण्यास एक दिवस लागत आहे.

याचबरोबर नागरिक तक्रार करत आहेत कि, पाहिजे त्या प्रमाणात चाचण्या पालिका प्रशासन करताना दिसत नाही. कोरोना साथीला आटोक्यात आण्यासाठी टेस्टिंग वाढविणे अत्यंत गरजेचे आहे.

पुणे महानगर पालिकेने 1 लाख कोरोना विषाणू अँटीजेन टेस्टिंग कीट खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या टेस्टिंग कीटमार्फत करोना संसर्गाचे निदान अर्ध्या तासात होणार आहे.

लवकर निदान झाल्यामुळे पुढील संसर्गाचा धोका टळणार आहे. याचबरोबर पुणे महानगर पालिका क्षेत्रात टेस्टिंग वाढून साथ आटोक्यात येण्यास मदत होणार आहे.

पिंपरी महापालिका क्षेत्रात कोरोना साथ आटोक्यात आण्यासाठी कमीत कमी 1 लाख कोरोना विषाणू अँटीजेन टेस्टिंग कीट खरेदी करण्याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा, अशी विनंती भोईर यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदनाद्वारे केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.