Pimpri : एटीएमचा गोपनीय पासवर्ड टाकून मशीनमधून पळवली दोन लाखांची रोकड

एमपीसी न्यूज – बँकेच्या एटीएमचा गोपनीय पासवर्डच्या सहाय्याने मशीन उचकटून त्यातील सुमारे दोन लाख रुपये चोरटयांनी लंपास केले. ही घटना बुधवारी (दि. 15) दुपारी साडे बाराच्या सुमारास पिंपरीतील हॉटेल डबल ट्री हिल्टनसमोर युनिअन बँकेच्या एटीएम केंद्रात उघडकीस आली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर बाबर यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक ग्राहक बुधवारी दुपारी हॉटेल डबल ट्री हिल्टनसमोर युनिअन बँकेच्या एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी गेला. मात्र एटीएम मशीन बंद असल्याने त्याने बँकेला याबाबत माहिती दिली. बँकेचे अधिकारी एटीएम केंद्रात पाहणी करण्यासाठी गेले. एटीएमच्या ड्रॉवरची तपासणी केली असता तो ड्रॉवर बँकेच्या गोपनीय पासवर्डचा सहाय्याने उघडून त्यातील रोकड लंपास केल्याचे निदर्शनास आले. अधिकाऱ्यांनी याबाबत पिंपरी पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

मशीनचा ट्रे उघडण्यासाठी दोन वेगवेगळ्या प्रकारचे पासवर्ड टाकावे लागतात. हे पासवर्ड अतिशय गोपनीय असल्याने या घटनेमुळे बँकेच्या अधिकाऱ्यांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे. पोलिसांनी घटनेचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. एटीएममध्ये सुमारे दोन लाखांची रोकड असून याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. दोन महिन्यापूर्वी निगडी प्राधिकरण येथे आंध्रा बॅंकेच्या एटीएममधून याचक पद्धतीने चोरटयांनी यातील तीन लाख 52 हजार 800 रुपयांची रोकड चोरून नेली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.