Sarthi Helpline : पिंपरी चिंचवड मनपाची सारथी हेल्पलाईन फक्त नावापुरतीच उरलीये का?

एमपीसी न्यूज : बऱ्याच नागरिकांना कटू अनुभव मिळाल्याने पिंपरी चिंचवड मनपाची सारथी हेल्पलाईन (Sarthi Helpline) फक्त नावापुरतीच उरलीये का? असा प्रश्न नागरिकांनी निर्माण केला आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त श्रीकर परदेशी यांनी सारथी प्रणाली सुरु केली होती. याचे लाँचिंग 15 ऑगस्ट 2013 रोजी करण्यात आले होते. यामध्ये पुस्तक, वेबसाईट, मोबाईल एप, ई- बुक, पीडीएफ बुकचा समावेश होता. तर, सारथी प्रणालीमधील सारथी हेल्पलाईन ही नागरिकांच्या समस्या निवारणासाठी आहे.

स्वतः आयुक्त श्रीकर परदेशी सारथी हेल्पलाईनवर तक्रार निवारणाचा प्रत्येक आठवड्याला व महिन्याला विभाग निहाय आढावा घेत. त्यामुळे नागरिकांच्या समस्यांचे निवारण लवकर होत असत. त्यामुळे नागरिक नगरसेवकांकडे तक्रार करण्याऐवजी ते सारथी हेल्पलाईनवर तक्रार करतात व त्यामुळे लवकर तक्रार निवारण होते असे. असा नागरिकांमध्ये समज झाला होता. तसेच, त्यावेळेस नगरसेवकांना वाटत होते की सारथीमुळे त्यांचे महत्त्व कमी झाले आहे.

सारथीची लोकप्रियता काही वर्षातच एवढी वाढली, की केंद्र सरकारने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला यासाठी सन्मानित केले. त्यामुळे देशभरातील मनपाचे उच्च अधिकारी सारथीची माहिती घेण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये येत व परत जाऊन त्यांच्या शहरांमध्ये अशी प्रणाली सुरु करत.

पिंपरी चिंचवड शहरात सारथी सुरु होऊन 9 वर्षे झाले (Sarthi Helpline) आहेत. पण, आता काही सामाजिक कार्यकर्ते, नागरिकांना त्यांनी सारथीवर तक्रार केली तर त्यांच्या तक्रारींचे निवारण होत नसल्याचे व आपोआप तक्रार विना कार्यवाही बंद होत असल्याचे कटू अनुभव येत आहेत. त्यामुळे काही सामाजिक कार्यकर्ते व नागरिक आता बोलू लागलेत की सारथी आता नावापुरतीच उरली आहे का? त्यामुळे mpcnews ने अशा काही सामाजिक कार्यकर्ते व नागरिक यांच्याशी याबाबत सपंर्क करून त्यांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

सारथी संस्थापक सदस्य अमित तलाठी यांनी सारथी मधील तृटींविषयी माहिती दिली. तसेच नागरिकांच्या कटू अनुभवामागील कारणे देखील सांगितली आहेत.

PCMC news : … तर महापालिका थकबाकीदार निवासी मालमत्तांधारकांची कार, टीव्ही  जप्त करणार

तलाठी म्हणाले, की नवीन आयुक्त शेखर सिंह प्रत्येक सोमवारी शहराच्या विविध भागात जनसंवाद सभा घेण्यावर जास्त लक्ष देत आहेत. बहुतांश नागरिकांना त्यांच्या ऑफिसला/ कपंनीला सोमवारी सुट्टी नसल्याने ते नागरी समस्यांची तक्रार करण्यासाठी जनसंवाद सभेसाठी जाऊ शकत नाही. पण, हल्ली सर्वांकडे मोबाईल फोन असल्याने सारथीवर ते कधीही व कुठूनही तक्रार देऊ शकतात. त्यामुळे सारथीला जास्त प्रभावी करण्यासाठी लक्ष दिले पाहिजे.

जर एका नागरिकाने कोणत्याही दुसऱ्या नागरिकाने केलेल्या अवैध बांधकाम, अतिक्रमण व इतर बेकायदेशीर कामाविरोधात सारथी वर तक्रार केली असेल तर त्या दुसऱ्या नागरिकाला तक्रारदारविषयी माहिती मनपा अधिकारी/ कर्मचाऱ्याकडून मिळते. त्यामुळे तक्रारदार ला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

अनेकदा नागरिक कुठे बाहेर गेल्यास त्यांना रस्त्याच्या कडेने समस्या दिसतात जसे तुटलेले फुटपाथ व न चालणारे पथदिवे पण त्याविषयी ते घरी/ ऑफिसला जाऊन सारथीवर तक्रार देतात. ज्यामुळे सारथीमध्ये तक्रारीचे ठिकाण घर/ ऑफीसचा जीपीएसद्वारे पत्ता घेतला, जातो जे चुकीचे आहे.

सामाजिक कार्यकर्ते व पर्यावरण प्रेमी प्रशांत राऊळ म्हणाले की, “सारथीमध्ये दिलेले तक्रारींचे प्रकार खूप कमी आहेत. आपल्याला जर रस्त्यावर किंवा उघड्यावर जळत असलेल्या कचऱ्याबाबत तक्रार द्यायची असेल, तर अशी कोणती कॅटेगरी (प्रकार) उपलब्ध नाही. जर, आपल्याला आपण केलेल्या तक्रारीवर केलेल्या कारवाईची माहिती घेण्यासाठी स्टेटस चेक करायचे असेल, तर आपल्याला आपण केलेल्या लेटेस्ट तक्रारी दिसत नाहीत. तसेच, यामुळे जर प्रशासनाने आपली तक्रार विना कार्यवाही बंद केली असेल तर आपल्याला ती तक्रार दिसत नसल्याने आपण ती रिओपन करू शकत नाही. तक्रार बंद झाल्यानंतर पुढील सात दिवसात ती री ओपन केली नाही, तर परत नवीन तक्रार द्यावी लागते. त्यामुळे तक्रार निवारणासाठी खूप वेळ लागतो.”

सामाजिक कार्यकर्त्या बिल्वा देव (Sarthi Helpline) म्हणाल्या की, “जास्त डास झाल्याने डास उत्पत्ती कमी करण्यासाठी ध्रुवीकरण करावे अशी तक्रार मी सारथीवर दिली होती. त्याच्यावर लगेच प्रशासनाने कार्यवाही केली होती. त्यामुळे मला सारथीचा चांगला अनुभव आला आहे. तक्रार निवारण करण्याची गती प्रत्येक विभागासाठी वेगळी असावी, त्यामुळे काही लोकांच्या तक्रारींचे निवारण झाले नसावे.”

याबाबत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, म्हणाले की, “सारथीवरील तक्रारींचा निपटारा व्यवस्थित होत आहे. आम्ही यासाठी काही सुधारणा देखील केल्या आहेत. याविषयी अधिक माहिती उप आयुक्त विठ्ठल जोशी सांगू शकतील.”

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उप आयुक्त विठ्ठल जोशी म्हणाले की, “तक्रार आपोआप विना कार्यवाही बंद झाली तर ती रिओपन करता येते. दोनदा एकच तक्रार रिओपन झाली असेल व कारवाही न झाल्याने तिसऱ्यांदा रिओपन केली गेली तर ती तक्रार डायरेक्ट अतिरिक्त आयुक्तांकडे जाते व ते तिचा निपटारा करतात. तक्रारदार ज्या ठिकाणी- म्हणजे घरी/ कपंनीमध्ये बसून दुसऱ्या ठिकाणची तक्रार देत असेल तर त्याच्या घरी/ कपंनीचा पत्ता तक्रारीत येईल. आता आपल्या सिस्टममध्ये सुविधा नाही, की नागरिक स्वतः ठिकाण नोंद करू शकेल.”

जोशी पुढे म्हणाले की, “आत्ताच मला एक तक्रार आली, की तक्रार रिओपन करता येत नाही. आज सुट्टी असल्याने त्यावर कार्यवाही करता येत नाही. उद्या सकाळी मी तक्रार रिओपन करण्यामध्ये काय समस्या आहेत, ते चेक करून कार्यवाही करेन.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.