Pimpri Chinchwad Police : मद्य प्राशन करून वाहन चालवणे आता पडणार महागात; पोलिसांचे मोठे पाऊल

एमपीसी न्यूज – मद्य प्राशन करून वाहन चालविल्याने अपघातांची (Pimpri Chinchwad Police) शक्यता अनेक पटींनी वाढते. त्यामुळे अशा वाहन चालकांवर कठोर कारवाईची विशेष मोहीम पिंपरी-चिंचवड पोलीस राबविणार आहेत. वाहन चालकांवर आर्थिक दंड अथवा थेट खटले दाखल करण्यात येणार आहेत.

नागरीक मद्य प्राशन करुन वाहने वेगात व धोकादायकरित्या चालवतात. यामुळे अपघात होऊन स्वतःच्या तसेच इतरांच्या जिवीतास व मालमत्तेस धोका निर्माण होतो. मद्य पिऊन वाहने चालवणाऱ्या तळीरामांची संख्याही अधिक असते. अशा वाहन चालकांमुळे अपघाताची शक्यता वाढते. हमरीतुमरी आणि वादही होतात. हे प्रकार टाळण्यासाठी पिंपरी चिंचवड वाहतूक पोलीस विशेष मोहीम राबविणार आहेत.

विशेषतः रात्रीच्या वेळी ही मोहीम राबवली जाणार आहे. रात्रीच्या (Pimpri Chinchwad Police) वेळी अवजड वाहने चालविणारे चालक मद्य प्राशन करीत असल्याचे वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी नाकाबंदी लाऊन चालकांची ब्रेथ अॅनालायझरद्वारे तपासणी केली जाणार आहे.

सहा महिन्यात 174 जणांचा मृत्यू

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहती आहेत. तिथे येणाऱ्या अवजड वाहनांची संख्या अधिक आहे. तसेच शहरीकरण वाढत असल्याने देखील वाहनांची संख्या वाढली आहे. त्यातच अपघातांचे प्रमाणही वाढू लागले आहे.

जानेवारी ते जून या सहा महिन्यांमध्ये रस्ते अपघातात 174 जणांचा मृत्यू झाला. तर 305 जण जखमी झाले आहेत.

कायद्याचा धाक

मोटर वाहन कायदा कलम 185 नुसार मद्य प्राशन करून वाहन चालवणे अपराध आहे. तर मोटर वाहन कायदा कलम 188 नुसार संबंधित वाहन चालकावर दंड केला जातो. प्रथम श्रेणी न्यायाधीशांसमोर हजर केले जाते.

गुन्हा कबूल केल्यास दहा हजार रुपयांचा दंड भरावा लागतो. अथवा मी तो गुन्हा केला नाही, हे संबंधित वाहन चालकाला न्यायालयात सिद्ध करावे लागते.

अशा खटल्यांमध्ये संबंधित वाहन चालकावर गुन्हा दाखल आहे, असे रेकॉर्ड तयार होते. हे रेकॉर्ड भविष्यात अनेक ठिकाणी अडचणीचे ठरू शकते.

सहा महिन्यातील रस्ते अपघात –
मृत्यू                जखमी
जानेवारी                26                   50
फेब्रुवारी                 26                   40
मार्च                     34                   39
एप्रिल                   30                   72
मे                        29                   61
जून                     29                   43

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.