Pimpri : पावसाच्या सावटाखाली मतदानाला उत्साहात सुरुवात

एमपीसी न्यूज – पावसाच्या सावटाखाली विधानसभा निवडणूक 2019च्या मतदानाला सुरुवात झाली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील तिन्ही मतदारसंघाच्या मतदान केंद्रावर नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत. पावसाच्या वातावरणात देखील नागरिकांनी मतदानातून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि मावळ विधानसभा मतदारसंघाच्या सर्व मतदानकेंद्रावर मतदारांचा उत्साह पाहायला मिळत आहे. मॉर्निंग वॉक करून येत येत अनेक जणांनी मतदानाचे कर्तव्य पार पाडले. 491 ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडत आहे.

दुपारनंतर हवामान विभागाने पावसाची शक्यता व्यक्त केल्यामुळे सकाळीच मतदान करण्यासाठी सर्वांची लगबग पाहायला मिळत आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आर्द्रता खेचून ईशान्य मोसमी वारे महाराष्ट्रातून जात आहे. यामुळे महाराष्ट्राच्या बहुतांश भागात कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. आज (सोमवारी) दुपारनंतर जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुके नागरिकांनी दुपारपर्यंत मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे. भर पावसात देखील नागरिक मोठ्या प्रमाणात मतदान करतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, चिंचवड विधानसभा मतदारसंघात दोन लाख 76 हजार 927 पुरुष आणि दोन लाख 41 हजार 980 महिला आणि इतर 32 असे एकूण पाच लाख 18 हजार 309 मतदार आहेत. त्यामध्ये 495 दिव्यांग मतदारांचा समावेश असून 171 सैनिक मतदारांनाही मतदानाचा हक्क बजाविता येणार आहे. 491 ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडत असून 33 मतदान केंद्राचे स्थलांतरण करण्यात आले आहे.

मावळ मतदारसंघात भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार बाळा भेगडे यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला. त्याचप्रमाणे त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँगेस काँग्रेस महाआघाडीच्या उमेदवार सुनील शेळके यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.