Pimpri : पालखी सोहळ्याला पिंपरी-चिंचवडकरांचा भक्तीभावाने निरोप

एमपीसी न्यूज – जगदगुरू श्री संत तुकाराम महाराज आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याला पिंपरी-चिंचवडकरांनी भक्तीभावाने निरोप दिला. दोनही पालख्यांनी पुणे महापालिकेच्या हद्दीत मार्गक्रमण केले.

Alandi : नोकरीच्या निमित्ताने वारकऱ्यांच्या सेवेची संधी मिळाली – कैलास केंद्रे

जगदगुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा रविवारी पिंपरी-चिंचवड शहरात आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात मुक्कामी होता. याठिकाणी पहाटे महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी पत्नी ईशा सिंह यांच्यासह संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे पूजन केले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, जितेंद्र वाघ, उपायुक्त रविकिरण घोडके, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे ,शीतल वाकडे ,अमित पंडीत , तसेच विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानचे गोपाळ कुटे आणि देहू संस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आयुक्त शेखर सिंह यांच्या उपस्थितीत आरतीदेखील संपन्न झाली.

यानंतर जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा आकुर्डीतील खंडोबामाळ चौक मार्गे फिनोलेक्स चौक ते खराळवाडी येथील विठ्ठल मंदिराकडे मार्गस्थ झाला. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा पालखी सोहळा खराळवाडी येथील विठ्ठल मंदिरात विसावला. सकाळी नऊच्या सुमारास पुढे मार्गस्थ झालेला पालखी सोहळा दुपारच्या मुक्कामासाठी दापोडी येथे थांबला. दुपारी दोननंतर हा पालखी सोहळा पुण्याच्या हद्दीत पोहोचला.

आकुर्डी ते दापोडी दरम्यान पालखी मार्गावर महापालिकेने नाशिक फाटा आणि फुगेवाडी येथे तर आळंदी रोडवर भोसरी फाटा येथे विश्रांती कक्ष उभारले होते. येथे वैद्यकीय पथकासह वैद्यकीय सुविधा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आरोग्य तपासणी व्यवस्था, स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्षाची व्यवस्था करण्यात आली होती. पालखी मार्गावर प्रति २०० मीटरच्या अंतरावर १० अधिकारी, कर्मचारी असलेल्या पथकाची नेमणूक करण्यात आली होती. असे एकूण १२ पथके संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर तैनात करण्यात आली होती.

सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास दिघी येथील मॅगझीन चौकात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आगमन झाले. पालखीचे महापालिकेच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी खासदार श्रीरंग बारणे उपस्थित होते. आयुक्त शेखर सिंह यांनी काही अंतर पालखी रथाचे सारथ्य देखील केले. पालिकेच्या वतीने हरितवारी काढून स्वच्छता, वृक्षारोपण इत्यादीबाबत जनजागृती करण्यात आली .

वारकऱ्यांना देशी वृक्षांच्या बिया वाटप करण्यात आल्या. भोसरी फाटा येथे फुलांच्या सजावटीत विठ्ठल रुक्मिणी तसेच संत ज्ञानेश्वर महाराज साकारण्यात आले होते . येथे नागरिकांनी तसेच वारक-यांनी सेल्फी घेण्यासाठी पसंती दिली . साधारणपणे दुपारी १२ च्या सुमारास संपूर्ण पालखी सोहळा पिंपरी चिंचवड शहराच्या हद्दीतून पुणे शहराच्या हद्दीकडे मार्गस्थ झाला. दोनही पालखी सोहळ्यासाठी प्रत्येकी दीडशे सफाई कर्मचारी तैनात करण्यात आले होते. पालखी मार्गावर कोठेही कचरा राहणार नाही याची दक्षता या पथकामार्फत घेतली जात होती.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.