Pimpri : पवना, इंद्रायणी, मुळा नद्या प्रदूषित करणाऱ्या कंपन्या; जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

माजी नगरसेवक मारुती भापकर यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना, (Pimpri) इंद्रायणी, मुळा नद्या प्रदूषित करणाऱ्या कंपन्या व जबाबदार संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

शहरातून पवना, इंद्रायणी व मुळा या तीन नद्या वाहतात. मावळात या उगम पावलेल्या नद्या शहरातच्या प्रवेशद्वारापर्यंत बर्यापैकी स्वच्छ निर्मळ असतात.

मात्र शहरात आल्यानंतर या पवित्र नद्यांचे अक्षरशः गटारी बनवण्याचे पाप पिंपरी-चिंचवड शहरातील राज्यकर्ते,प्रशासन व बेजबदार उद्योजक यांनी मिळून केले आहे.

वारकऱ्यांसाठी अत्यंत पवित्र असणारी इंद्रायणी नदी पात्रात पूर्णपणे फेसाळून ही इंद्रायणी की हिमालयातील हिमनदी असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती निर्माण झाली.

यापूर्वी देखील इंद्रायणी नदीमध्ये हजारो मासे मृत अवस्थेत आढळले (Pimpri) होते. नुकतेच पवना नदी केजुबाई बंधारा ते चिंचवडगाव पर्यंत या पावसाळ्यापासून रासायनिक मिश्रित पाण्यामुळे नदी फेसाळणे, नदीतील मासे मरणे हे प्रकार पाच वेळा घडले आहेत.

किवळे,पुनावळे, रावेत, ताथवडे, वाल्हेकरवाडी, थेरगाव, चिंचवडगाव, काळेवाडी, पिंपरी, पिंपळे गुरव, सांगवी, कासारवाडी व दापोडी अशी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतून सुमारे 25 किलोमीटर वाहते.

तसेच इंद्रायणी नदी देखील पिंपरी-चिंचवड शहरातून वाहते. या नद्यांमध्ये अनेक उद्योगपती त्यांच्या कारखान्याचे रासायनिक मिश्रित पाणी, अनेक सोसायटी आपारमेंट नागरी वस्तीतून मैलामिश्रित पाणी सोडून वर्षानुवर्ष नद्या प्रदूषित केल्या जातात.

या नद्यांमध्ये अनेक बांधकाम व्यवसायिक राडाराडा भरून नदीपात्र लहान करुन या जागेवरती प्लॉटिंग करून या जागा गोरगरीब नागरिकांना विकतात. या नदीपात्रात दरवर्षी जलपर्णी पूर्ण वाढून दिली जाते, मग कोट्यावधीचे टेंडर काढले जाते कागदाला कागद जोडून कोट्यवधीची बिले संगणमत करून काढले जातात. मात्र जलपर्णी ठेकेदाराला पूर्णपणे कधीच साफ होत नाही.

पावसाळ्यात नदीला पूर आल्यानंतर जलपर्णी वाहून जाण्याची वाट पाहिली जाते. आणि करदात्या नागरिकांचे कोट्यवधी रुपये लाटले जातात.

केंद्र सरकार राज्य सरकार व महापालिकेच्या वतीने नदीच्या सुशोभीकरणाचे कोट्यावधीचे प्रकल्प प्रस्तावित आहेत. त्याऐवजी नदी सुधारणा, मैला शुद्धीकरण प्रकल्प व नदीवरील अतिक्रमणे रोखण्यासाठी तसेच रासायनिक, मैलामिश्रित पाणी सोडणाऱ्या कंपन्या व इतर ठिकाणाच्या उगमापर्यंत सर्वे झाला पाहिजे. तसेच शहरातील संपूर्ण नद्यांचे, नाल्यांचे सर्वेक्षण करून या नद्यांमध्ये रसायनिक मिश्रित पाणी सोडणाऱ्या कंपन्या, मैला मिश्रित पाणी सोडणाऱ्या सोसायटी,आपारमेंट व नदीपात्रात राडाराडा टाकणारे बांधकाम व्यवसायिक, नदीपात्रात प्लॉटिंग करून जमिनीची विक्री करणारे लँड माफिया यांच्यावर तातडीने फौजदारी कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.