Pimpri : गणेशोत्सव पर्यावरणपूरक, शांततेत, सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी सहकार्य करा

महापालिका, पोलीस आयुक्तांचे आवाहन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील १९ ते २८ सप्टेंबर या (Pimpri) कालावधीत साजरा होणारा गणेशोत्सव हा पर्यावरणपूरक, शांततेत व सुरक्षितपणे पार पाडण्याकरीता नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त शेखर सिंह तसेच पिंपरी-चिंचवड शहर पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी केले.

मंडळांनी आमंत्रणे दिलेल्या व्हीआयपी निमंत्रितांच्या आगमानाच्या वेळी व कार्यक्रमाच्या दरम्यान आवश्यक ती दक्षता घ्यावी. गर्दीमुळे कोणताही अनुचीत प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी. सार्वजनिक मंडळ परिसरात फुलांचे हार, नारळ, मिठाई, प्रसाद इत्यादी दुकाने कमीत कमी असतील याची दक्षता घ्यावी.

महाराष्ट्र शासनाचे अधिनियमानुसार प्लास्टीक पिशव्या व इतर प्लास्टीक वस्तूंवर बंदी करणेत आली असल्याने त्यांचा वापर टाळावा. गणेशोत्सव कालावधीत रस्ता पदपथांवर सिझनेबल खाद्यपदार्थ विक्रेत्यांना परवानगी देण्यात येणार नाही.

अनधिकृत फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास पूर्णपणे प्रतिबंध असेल. रुग्णवाहिका, अत्यावश्यक सेवेतील वाहने, रिक्षा सहजपणे जाऊ शकतील एवढी मोकळी जागा ठेवणे आवश्यक राहील.

ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) व नियम २००० मधील परिच्छेद ४ चे तरतूदीप्रमाणे रुग्णालय, शैक्षणिक संस्था, न्यायालय, दवाखाने यांचे सभोवताली कमीत कमी १०० मीटरचे परिसरात ध्वनीक्षेपकाचा वापर करु नये तसेच मंडळांनी ध्वनीक्षेपकाचा कमीत कमी वापर करावा

गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना केलेल्या परिसरात आग प्रतिबंधक (Pimpri) उपाययोजना कराव्यात. मंडळाजवळ हजर स्वयंसेवक, कार्यकर्ते, नागरिक यांनी मद्यसेवन करु नये तसेच मद्यसेवन केलेल्या व्यक्तीला मंडळाच्या मंडपाजवळ येण्यास प्रतिबंध करावा.

कोणत्याही प्रकारचा जुगार खेळू नये. काही अनोळखी, संशयीत, बेवारस वस्तु उदा. सुटकेस, रेडिओ, मोठे घड्याळ, जेवणाचे डबे, सायकली वगैरे आढळून आल्यास अगर संशयीत व्यक्ती, इसम जवळपास फिरतांना   रेंगाळताना दिसल्यास ताबडतोब पोलीसांना कळवावे. गणेश मूर्तीच्या अंगावर मौल्यवान दागिने असणा-या गणेश मंडळांनी संरक्षणाची विशेष  काळजी घ्यावी.

श्रींच्या मुर्तींचे संरक्षणाकरीता मंडळाचे कार्यकर्ते अथवा खाजगी सुरक्षा रक्षक २४ तास हजर राहतील याची दक्षता घ्यावी तसेच गर्दी टाळावी.

मूर्तीदान करण्यास प्राधान्य द्यावे

घरगुती गणपती व गौरीचे विसर्जन नागरिकांनी शक्यतो घरी करण्यास व मूर्तीदान करण्यास प्राधान्य द्यावे. गणेश मंडळांनी गणेश मूर्तींचे विधीवत विसर्जन मंडपालगत ( कृत्रिम हौदामध्ये ) करण्यास प्राधान्य द्यावे. गणेश विसर्जन दिवशी ( दिड दिवस, पाच दिवस, सात दिवस, नऊ दिवस व दहा दिवस ) पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयांमार्फत मूर्ती व निर्माल्य संकलनाकरीता फुलांनी सजवलेले सुशोभिकरण रथ उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

महानगरपालिकेच्या प्रत्येक वॉर्डमध्ये मूर्ती संकलन केंद्र उपलब्ध असणार आहेत तसेच त्या मूर्ती विसर्जन करण्याकरीता नेण्यासाठी वाहने उपलब्ध असणार आहेत.

श्रींच्या विसर्जनाकरीता प्रत्येकी २ कन्वेअर बेल्ट एका विसर्जन ठिकाणांवर उपलब्ध असतील. आवश्यकता असल्यास अधिकचे कन्वेअर बेल्ट उपलब्ध करून देण्यात येतील.

प्रत्येक प्रभागातील सुशोभित रथाच्या मूर्ती संकलनासाठी Route Chart ( मार्ग क्रमणिका ) प्रसिध्द करण्यात येणार असून त्यानुसार नागरिकांनी व मंडळांनी गणेशमूर्तीं दान कराव्यात    तसेच निर्माल्य स्विकारण्यासाठी ठेवण्यात आलेल्या वाहनात निर्माल्य द्यावे. महानगरपालिकेद्वारे संकलित केलेल्या गणेशमूर्तींचे विधीवत रित्या व पावित्र्य राखून विसर्जन करण्यात येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.