Pimpri: सत्ताधा-यांना मिळतोय स्वपक्षीय नगरसेवकांकडूनच घरचा आहेर!

विरोधकांसोबत सत्ताधारीही करताहेत 'रिंग'चे आरोप

(गणेश यादव)

विकासकामांमध्ये रिंग होत असल्याचा तक्रारी

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपवर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना हे विरोधी पक्ष भ्रष्टाचार,’रिंग’झाल्याचे वारंवार आरोप करत आहेत. परंतु, विरोधक असल्याने आरोप करणारच असा समज करत प्रशासन आणि सत्ताधारी त्याकडे दुर्लक्ष करत होते. मात्र, आता स्वपक्षातील नगरसेवकच विकासकामात भ्रष्टाचार, ‘रिंग’ होत असल्याच्या तक्रारी करीत आहेत.  स्वपक्षीय नगरसेवकच ‘रिंग’ होत असल्याच्या तक्रारी करत असल्याने पदाधिकारी आणि प्रशासनाला याचा गांभीर्याने विचार करावा लागणार आहे.

पारदर्शक कारभारासाठी शहरवासियांनी पिंपरी महापालिकेत मोठ्या अपेक्षेने सत्तांतर करत भाजपकडे एकहाती सोपविली. त्यामुळे अनेक वर्ष विरोधात असलेले सत्ताधारी झाले अन्‌ पक्षाच्या स्थापनेपासून सत्तेत असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसवाले विरोधात बसले. तथापि, पावणे दोन वर्ष होऊनही सत्ताधा-यांना पारदर्शक कामाची चुणूक दाखविता आली नाही. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळेच सत्ताधारी अधिक चर्चेत राहिले आहेत.

सत्तेच्या सुरुवातीपासून विरोधकांनी भाजपवर भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या फैरी झाडायला सुरुवात केली आहे. त्यामध्ये पंतप्रधान आवास योजना, कच-याची निविदा, 425 कोटींची रस्त्यांची कामे,  महापालिकेतील अधिकारी, पदाधिकारी पैसे मागत असल्याची थेट पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार यामुळे विकासकामांपेक्षा भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे आणि पक्षातील मतभेदांमुळेच सत्ताधारी भाजप अधिक चर्चेत राहिला. सत्ताधारी भाजपमध्ये दोन गट आहेत. गटा-तटात सत्ता विभागली गेली आहे. त्यामुळे अडवा आणि जिरवाचे काम केले जात आहे. त्यातूनच सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांमध्ये मतभेद निर्माण होत आहे. गट-तटाचे मोठ्या प्रमाणात राजकारण चालत आहे. त्यातूनच अनेक नगरसेवक महासभेत विरोधाची भूमिका घेतात.

विविध विकासकामांमध्ये सत्ताधारी पदाधिका-यांकडून ‘रिंग’ केली जात आहे. मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जात आहे. त्याला आयुक्तांचा देखील पाठिंबा असल्याचे आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेनेकडून केला जातो. परंतु, विरोधक असल्याने सत्ताधारी आणि प्रशासनाकडून त्यांच्या आरोपांकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. आता स्वपक्षातील नगरसेवकच विविध विकासकांमाबाबत आक्षेप घेताना दिसत आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत करण्यात येणा-या नेटवर्किंगच्या कामासाठी काढण्यात आलेल्या निविदेत ‘रिंग’ करुन  एल.ऍन्ड.टी कंपनीला काम देण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप स्मार्ट होत असलेल्या पिंपळे-सौदागर परिसरातील भाजपचे नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी केला आहे. तसेच ही निविदा प्रक्रिया रद्द करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. तर, पिंपळे-निलखचे भाजपचेच नगरसेवक तुषार कामठे यांनी देखील मागील काही महिन्यांपासून  अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमताने ज्यादा दराच्या निविदा भरल्या जात असल्याचा आरोप केला आहे. डांगे चौक व काळेवाडी फाटा येथे ग्रेडसेपरेटर बांधण्याच्या कामाची निविदा जादा दराची असून ती रद्द  करण्यात यावी , अशी मागणीही त्यांनी केली आहे.

त्यामुळे विरोधकांबरोबच सत्ताधारी पक्षातील नगरसेवक देखील चुकीच्या कामाबाबत आवाज उठवित आहेत. त्यामुळे चुकीच्या कामाला लगाम घालण्यासाठी पदाधिका-यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. तसेच प्रशासनाने देखील हे आरोप गांभीर्याने घेत त्याची चौकशी करणे गरजेचे आहे. स्वपक्षातील नगरसेवकच आरोप करत असल्याने सत्ताधारी भाजपाला याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आगामी वर्ष निवडणुकीचे आहे. त्यामुळे तक्रारींचे वेळीच निराकारण करणे गरजेचे आहे. अन्यथा निवडणुकीत सत्ताधा-यांना याचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.