Pimpri : बांधकाम कामगाराच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा

एमपीसी न्यूज – एकोणिसाव्या मजल्यावरून काम करत असताना पडल्याने बांधकाम कामगाराचा मृत्यू झाला. तर, दोन कामगार जखमी झाले. ही घटना बुधवारी (दि. 10) दुपारी साडेबाराच्या सुमारास पिंपरी येथे घडली. याप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल केला आहे.

राजकुमार अशोक घोसले (वय 24, रा. छत्तीसगड) असे मृत कामगाराचे नाव आहे. तुकाराम बाबू मासाळ (वय 49, रा. पिंपरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक ज्ञानोबा निकम यांनी फिर्याद दिली.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीमध्ये म्हाडाच्या इमारतीचे काम सुरू आहे. त्या इमारतीवर अनेक कामगार काम करत आहेत. राजकुमार या साईटवर प्लास्टरचे काम करत होते. क्रेनवर उभा राहून प्लास्टर करत असताना क्रेनचा ब्रेक फेल झाल्याने क्रेन एकोणिसाव्या मजल्यावरून खाली आले. या अपघातात राजकुमार गंभीर जखमी झाले. तर अन्य दोन कामगार किरकोळ जखमी झाले. तिघांना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, राजकुमार यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

ठेकेदार तुकाराम मासाळ याने कामगारांना चांगल्या प्रतीची सुरक्षा साधने पुरवली नाहीत. लिफ्टचे ब्रेक तपासून घेण्यात ठेकेदाराने निष्काळजीपणा केला. यामुळे ठेकेदार तुकाराम याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.