Pimpri Crime News: कामगारांना वेळेत आणि किमान दराने वेतन न दिल्याने ‘गुरुजी’चा ठेका रद्द

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून ठेका घेऊन शहरातील रस्ते आणि गटर्स साफसफाईचे कामकाज करणाऱ्या मेसर्स गुरुजी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी व्यवस्थापनाने कामगारांना वेळेत आणि किमान दराने वेतन दिले नाही. त्यामुळे त्यांचे काम तत्काळ प्रभावाने बंद करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. तसेच, कामात खंड पडू नये म्हणून तीन ठेकेदारांची थेट पद्धतीने नियुक्ती करत कामकाज विभागून देण्यात आले आहे.

महापालिका कार्यक्षेत्रातील रस्ते आणि गटर्स साफसफाईचे कंत्राट मेसर्स गुरुजी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड यांना दोन वर्षांसाठी बहाल करण्यात आले. फ, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयाचे कामकाज या ठेकेदारामार्फत सुरु आहे. त्यासाठी त्यांनी वेळोवेळी मुदतवाढही देण्यात आली. तथापि, या ठेकेदाराच्या कामकाजाविषयी तक्रारी आल्या. किमान वेतन न देणे, वेतन वेळेवर अदा न करणे आदी तक्रारीही कामगारांनी केल्या.

या तक्रारींची शहानिशा करण्यासाठी चौकशी समिती गठीत करण्यात आली. या चौकशी समितीत दोषारोप सिद्ध झाले. त्यानुसार, ‘मेसर्स गुरुजी’चे कामकाज तत्काळ थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, त्यांच्याकडील क्षेत्रीय कार्यालयाचे कंत्राट तीन ठेकेदारांना विभागून देण्यात आले आहे. मेसर्स तिरुपती इंडस्ट्रीयल सव्र्हिसेस यांच्याकडे फ क्षेत्रीय कार्यालय, मेसर्स शुभम उद्योग यांच्याकडे ग क्षेत्रीय कार्यालय आणि मेसर्स परफेक्ट फॅसिलीटी यांच्याकडे ह क्षेत्रीय कार्यालयाचे कंत्राट थेट पद्धतीने बहाल करण्यात आले आहे.

कंत्राटी सफाई कामगारांना किमान वेतन दराने वेतन न देता त्यांचा विश्वासघात केल्याप्रकरणी मेसर्स गुरुजी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या संचालकांसह 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील सात जणांना पोलिसांनी गजाआड केले आहे. हा प्रकार 16 डिसेंबर 2017 ते 24 जुलै 2019 या कालावधीत पिंपरी – चिंचवड महापालिका येथे घडला.

संचालक हायगरीब एच गुरु (वय 60), सहसंचालक मीनाक्षी एच गुरु (वय 36, दोघे रा. भाईंदर, ठाणे), अकाउंट फायनान्स चंदन जलधर मोहंती (वय 36,रा.चिंचवडगाव), मार्केटिंग रिक्रूटमेंट ऑफिसर प्रमोद कुमार प्रफुल बेहुरा (वय 39), मार्केटिंग व फिल्ड ऑफिसर कार्तिक सूर्यमनी तराई (वय 51, तिघे रा. चिंचवड), मार्केटिंग व फिल्ड ऑफिसर पवन संभाजी पवार (वय 29, रा. तळवडे), सुपरवायझर बापू पांढरे (वय 35, रा. रहाटणी), सुपरवायझर नितीन गुंडोपण माडलगी (वय 46, रा. चिंचवड), विश्वनाथ विष्णू बराळ (वय 40, रा. चिंचवडगाव), अक्षय चंद्रकांत देवळे (वय 26, रुपीनगर), स्वप्नील गजानन काळे (वय 32), नंदू ढोबळे (वय 35), चंदा अशोक मगर (वय 40, निगडी), धनाजी खाडे (वय 40,निगडी), ज्ञानेश्वर म्हाम्बरे (वय 40, चिखली) आणि इतर यांच्या विरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेचे कामगार कल्याण अधिकारी प्रमोद श्रीरंग जगताप यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कामगारांचे एटीएम कार्ड, कागदपत्रे बळजबरीने काढून घेतली
या आरोपींनी संगनमत करून पिंपरी – चिंचवड महापालिकेसोबत केलेल्या करारातील अटींचे पालन केले नाही. किमान वेतन कायदा आणि इतर अनुषंगिक कायद्यानुसार सफाई कामगारांना कामाची संपूर्ण रक्कम न देता महापालिकेची फसवणूक केली. स्वत:च्या आणि कंपनीच्या फायद्यासाठी सफाई कामगारांचा विश्वास संपादन करून त्यांच्या बँक अर्जांवर सह्या आणि अंगठे घेतले. सफाई कामगारांची बँक खाती उघडून काही कामगारांना मिळालेले बँकेचे एटीएम कार्ड व कागदपत्रे बळजबरीने काढून घेतले. काही कामगारांनी किमान 13 हजार रुपये पगार द्यावा अशी मागणी केल्याने त्यांना कामावरून कमी करण्यात येईल अशी धमकी दिली. कामगारांचे बँक एटीएम व कागदपत्रे आरोपींनी स्वत:जवळ ठेवत प्रत्येक महिन्याला प्रत्येकी कामगाराकडून चार हजार रुपये खंडणी उकळली. अकुशल कामगारांना प्रत्यक्षात मिळणारे किमान वेतन न देता ते कमी प्रमाणात रोख स्वरूपात देऊन कामगारांचा विश्वासघात केला, असे फिर्यादीत म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.