Pimpri: पैशांची मागणी करत लॉज व्यवस्थापकावर पिस्तुल रोखले

एमपीसी न्यूज – दोन जणांनी लॉजमध्ये घुसून व्यवस्थापकाच्या डोक्याला पिस्तुल लावून दहा हजार रूपयांची मागणी करत जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार देहूरोड येथील एका लॉजमध्ये घडला. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

अमित गजानन वानारे (वय-28 , रा. आदर्शनगर, किवळे) आणि आशिष किसन भटकर (वय 26, दत्तनगर, किवळे) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांना वडगाव-मावळ न्यायालयात हजर केले असता 3 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. याप्रकरणी करण प्रकाश नायर (वय 32, रा. दत्तवाडी) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपींपैकी वानारे याच्यावर यापूर्वी सांगलीत गोळीबार करून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. त्याच्याकडून बेकायदा बाळगलेले पिस्तुल जप्त करण्यात आले आहे. गुरूवारी मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास आरोपी लॉजमध्ये आले. नायर यांना दहा हजार रूपयांची मागणी करत डोक्याला पिस्तुल लावले. तसेच शिवीगाळ व दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिली, अशी माहिती फौजदार मनोज पवार यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.