Pimpri Crime News : अस्तित्व संपलेल्या गुन्हेगारी टोळ्या पुन्हा सक्रिय; शहरात राजकीय आणि औद्योगिक शांततेला पुन्हा ग्रहणाचा धोका

एमपीसी न्यूज – ज्या गुन्हेगारी टोळीचे अस्तित्व संपले आहे, अशा टोळीतील काही जण पुन्हा आपली पाळेमुळे शहरात रुजवू पाहत आहेत. माथाडी संघटनेच्या निमित्ताने संपुष्टात येत असलेली गुन्हेगारी पुन्हा डोके वर काढू पाहत आहे. यामुळे आपल्या कठोर कारवाईसाठी ओळखले जाणारे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यासमोर आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.

1990च्या दशकात प्रकाश चव्हाण याने सातारा जिल्ह्यातून गुन्हेगारीला सुरुवात केली. दरोडे टाकण्यापासून ते खून, खुनाचा प्रयत्न, हप्ते वसुली तसेच गुन्हेगारी टोळी निर्माण करण्यापर्यंत त्याची मजल गेली होती. 2007 मध्ये त्याने पालिकेची निवडणूक देखील लढवली. मात्र त्यात त्याला अपयश आले.

त्यानंतर त्याने गुन्हेगारी आणि कामगार क्षेत्रात लक्ष केंद्रित केले. अरुण गवळी टोळीशी देखील त्याचा संबंध जोडला जात होता. राजकीय आश्रयामुळे प्रकाश चव्हाण याला कामगारांचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. 2016 मध्ये त्याची हत्या झाली.

याच प्रकाश चव्हाणचा मामा एकनाथ मोहिते देखील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. 2000 साली वडगावातील एका खंडणीच्या गुन्ह्यात मोहिते याला 14 वर्ष कारावासाची शिक्षा मिळाली होती. ही शिक्षा पूर्ण करून मोहिते काही महिन्यांपूर्वी बाहेर आला आहे. त्यानंतर अनेक सराईत गुन्हेगारांना सोबत घेऊन माथाडी संघटनेच्या माध्यमातून पुन्हा एकदा औद्योगिक क्षेत्रात वावरण्याचा प्रयत्न केला जात आहे.

महाराष्ट्र राज्य माथाडी या संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष पदावर मोहिते याची निवड झाल्याबद्दल तसेच प्रकाश चव्हाण याच्या जन्मदिनानिमित्त पूर्णानगर, चिखली येथे कार्यालयाचे उद्घाटन करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याच्या जाहिरातबाजीसाठी शहरभर बॅनर लावले गेले होते. याची माहिती मिळताच चिखली पोलिसांनी एकनाथ मोहिते याला 149 नुसार नोटीस दिली आहे.

ही नोटीस पोलिसांनी मोहिते याच्या मुलाकडे दिली आहे. पोलिसांनी वेळीच कारवाई केल्याने कार्यालय उद्घाटनाचा घाट उधळला गेला आहे.

प्रकाश चव्हाण टोळीचे अस्तित्व मागील काही वर्षांपूर्वी पिंपरी-चिंचवड शहरातून संपुष्टात आले आहे. मात्र पुन्हा या टोळीची पाळेमुळे रुजवण्याचा प्रयत्न केला जात आहे. एकनाथ मोहिते यांनी ठिकठिकाणी लावलेल्या बॅनरवर अनेक सराईत गुन्हेगार आहेत. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तर ही तयारी नाही ना, अशी चर्चा सध्या शहरात सुरू आहे.

कारण प्रकाश चव्हाण याने देखील एकदा महापालिका निवडणुकीत आपले नशीब आजमावले होते. पण त्यात त्याला यश आले नाही. आता पुन्हा तसाच प्रकार होणार नाही ना, असे बोलले जात आहे.

आपल्या कठोर कारवाईसाठी ओळखले जाणारे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पिंपरी चिंचवड शहरात शांतता राहावी, प्रस्थापित सर्व प्रकारच्या गुन्हेगारीचा बिमोड व्हावा म्हणून सामाजिक सुरक्षा पथक तसेच गुंडा विरोधी पथकाची स्थापना केली. या पथकांच्या माध्यमातून अनेक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले.

आता प्रकाश चव्हाण टोळी बॅनरबाजी करत आहे. वडगाव मावळपासून पिंपरी-चिंचवड शहरापर्यंत मोठ्या प्रमाणात बॅनर लावण्यात आले आहेत. त्या बॅनरवरती अनेक हिस्ट्रीशीटर आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात राजकीय आणि औद्योगिक शांतता राखणे हे पोलिसांसमोर नवीन आव्हान बनले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.