Pimpri : पदपथांवर कोट्यवधींचा खर्च तरीही पादचारी रस्त्यावरच

एमपीसी न्यूज – शहरातील सुस्थितीतील रस्ते तोडून (Pimpri) प्रशस्त पदपथ, सायकल मार्ग तयार केले जात आहेत. कोट्यवधींचा खर्च करून तयार केलेले पदपथ विक्रेते, दुकानदारांच्या साहित्यांनी व्यापलेले आहेत. त्यामुळे पदपथांना अतिक्रमणांनी विळखा घातला असून, पादचाऱ्यांना सेवा रस्त्यावरूनच चालावे लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे कोट्यवधींचा खर्च करूनही पादचारी रस्त्यावरच असल्याचे दिसून येत आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरात रस्ते, पदपथ विकसित करण्याचे धोरण अवलंबले आहे. त्यासाठी सुस्थितीतील रस्ते तोडून नव्याने तयार केले जात आहेत. अधिक रुंदीचे पदपथ बनवून सायकल मार्गाची भर घातली जात आहे. मात्र, हे पदपथ, सायकल मार्ग एकसलग नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सांडपाणी वाहिनीचे झाकण, पदपथावरील झाडे, वीजेचे खांब, बाके, कठडा, नामफलक असे अडथळे पार करीत ये-जा करताना पादचाऱ्यांना अक्षरश: अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. अनेक पदपथांवर दुकानदार, विक्रेते आणि वाहनचालकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून निर्माण केलेल्या पदपथांचा उद्देश सफल होत नसल्याचे चित्र आहे.

नव्या संकल्पनेमुळे पादचारी, सायकलस्वारांना सुरक्षित मार्ग मिळणार आहे. त्यामुळे पायी, सायकलने ये-जा करणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. वायू, ध्वनिप्रदूषणात घट होणार आहे. पदपथावरील अतिक्रमणे क्षेत्रीय कार्यालयाच्या पथकाकडून हटवली जातात, असे स्थापत्य प्रकल्प विभागाचे सहशहर अभियंता प्रमोद ओंभासे यांनी सांगितले.

पदपथ आणि सायकल मार्गांवर झालेला खर्च

दापोडी ते पिंपरी (दोन्ही बाजू)- 109 कोटी (Pimpri)
पिंपरी ते निगडी (एक बाजू)- 60 कोटी
निगडी ते पिंपरी (एक बाजू)- 60 कोटी
टेल्को रोड-लांडेवाडी ते थरमॅक्स चौक -160 कोटी
बिर्ला रुग्णालय ते डांगे चौक- 19 कोटी
डांगे चौक ते कस्तुरी चौक- 15 कोटी
शिवार चौक ते गोविंद गार्डन चौक- 55 कोटी
सांगवी ते किवळे- 90 कोटी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.