Pimpri: घनकचऱ्याच्या निविदेत दुरूस्ती करुन कचरावेचकांना न्याय द्या

कागद, काच, पत्रा, कष्टकरी पंचायतीची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने घनकचरा व्यवस्थापनाची नवीन निविदा काढली आहे. या निविदेनुसार कचरा संकलन करण्यासाठी असणा-या वाहनावरील एक कर्मचारी कमी केला जाणार आहे. त्यामुळे उर्वरित कचरा वेचकांवर अन्याय होणार असून, ते बेरोजगार होणार आहेत. त्यामुळे घनकच-याच्या निविदेत दुरूस्ती करून कचरा वेचकांना न्याय द्या, अशी मागणी कागद, काच, पत्रा, कष्टकरी पंचायतीच्या वतीने करण्यात आली.

आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. सोनाली कुंजीर, सुरेखा म्हस्के, गीता तामचीकर, आशा खरात, सीता पवार, सोमनाथ दळवी आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, शहरात दररोज कचरा गोळा करण्यासाठी 1 हजार 200 कामगार काम करत आहेत. त्यामध्ये कचरा गोळा करणे व वाहन चालवणे आदी लोकांचा समावेश आहे. एका वाहनांवर 1 वाहनचालक आणि दोन कामगार असे प्रकारचे काम 2010 पासून वेगवेगळ्या संस्था व ठेकेदारामार्फत 800 कामगार व 400 वाहनचालक काम करत आहेत. सध्या महापालिकेच्या वतीने आठ वर्षांसाठी नवीन निविदा काढण्यात आली आहे.

त्यामध्ये सध्या काम करणा-या सर्व कामगारांना कामावर घेणे बंधनकारक असल्याचा उल्लेख नाही. एका वाहनावर एक कचरावेचक असा उल्लेख आहे. त्यामुळे कामगारांची पिळवणुक होणार आहे. त्यामुळे घनकच-याच्या निविदेत दुरूस्ती करून कचरा वेचकांना न्याय द्यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.