Pimpri: पक्षापलिकडची मैत्री… नेत्यांनीही घ्यावा धडा !

उपमहापौरांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा फलकावर सर्वपक्षीय नगरसेवक

 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील जुन्या नेत्यांमधील हेवेदेवे, हाडवैरीपणा, राजकीय विस्तव, बदला घेण्याची भुमिका जात नसताना नव्या राजकीय पिढीने मात्र; पक्षापलिकडची मैत्री कायम ठेवली आहे. वाल्हेकरवाडी प्रभागाचे नेतृत्व करणारे भाजपचे नगरसेवक तथा शहराचे उपमहापौर सचिन चिंचवडे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरभर झळकलेल्या फलकांवर सर्वपक्षीय नगरसेवक आहेत. ‘दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस’ असा फलकांवर मजकूर लिहिला आहे. त्यामुळे नव्यापिढीकडून जुन्या-जाणत्या नेत्यांनी धडा घ्यावा, अशी चर्चा शहराच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील जुन्या नेत्यांमध्ये तीव्र मतभेद आहेत. एकमेकांचे तोंड देखील त्यांच्याकडून पाहिले जात नाही. एकाच कार्यक्रमात असल्यावर नामोल्लेख देखील केला जात नाही. त्यामुळे जुन्या नेत्यांमध्ये राजकीय अपरिपक्तवता असल्याचे नेहमीच बोलले जाते. नव्या राजकीय पिढीने मात्र जुन्या नेत्यांचा हा आदर्श घेतला नाही. त्यांनी पक्षविरहित मैत्री कायम ठेवल्याचे चित्र समोर आले आहे.

उपमहापौर सचिन चिंचवडे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना शुभेच्छा देणारे फलक शहरभर झळकले आहेत. त्यावर सत्ताधारी भाजपसह विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेच्या नगरसेवकांची छबी छळकली आहे. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस’ असा फलकांवर मजकूर लिहिला आहे. त्यामुळे या फलकांची शहराच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणूक जवळ आली आहे. त्यामुळे निवडणुकीत पक्षविरहित दोस्ती कायम राहते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.