Pimpri : ‘इ-वेस्ट’ला मिळताहेत पैसे

एमपीसी न्यूज – आयटी हब मानल्या जाणाऱ्या (Pimpri) पिंपरी-चिंचवड शहरात ई-वेस्टचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. अनेक नागरिक ई-वेस्ट कचऱ्यामध्ये टाकून देतात. त्यामुळे पर्यावरणाचा गंभीर प्रश्न निर्माण होतो. याचाच विचार करून महापालिका ग्रीन स्केप आणि ई.सी.ए. यांच्या संयुक्त विद्यमाने ई-वेस्ट रिसायकलिंग, प्लॅस्टिक रिसायकलिंग कम हॅबी सेंटर भोसरी येथे उभारण्यात आले आहे. या दोन्ही संस्था शहरातील विविध भागात जाऊन ई वेस्ट संकलित करत आहेत. नागरिकांना ई वेस्टसाठी किलोनुसार पैसेही देण्यास सुरूवात करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहर परिसरात हिंजवडी, तळवडे सारखे देशातील नामांकित आयटी पार्क विकसित झाले आहे. तसेच नागरिकांचा दिवसेंदिवस मोबाइल, लॅपटॉप, टिव्ही यासह महत्वाच्या गॅझेटचा वापर वाढला आहे. मात्र, या वस्तू नादुरुस्त झाले की अनेक जण भंगारात टाकून देतात. एकीकडे शहराची सध्यस्थिती सुमारे 30 लाखांच्या आसपास लोकसंख्या आहे. लोकसंख्या वाढीनुसार ई वेस्टही सातत्याने वाढत आहे. ई वेस्टचा पुर्नवापर होत नसल्याने पर्यावरणाचा प्रश्‍नही गंभीर होत आहे. त्यामुळे महापालिका आणि शहरातील काही पर्यावरण प्रेमी सामाजिक संस्थांच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून ई वेस्ट संकलन मोहिम राबविण्यात येत आहे. गेल्या पावणेदोन वर्षांत शहरातील विविध भागातून 3 हजार 962 किलो ई वेस्टचे संकलन करण्यात आले आहेत.

Maharashtra News : शासकीय आयटीआय मधील विद्यार्थ्यांना मिळणार दरमहा पाचशे रुपये विद्यावेतन

याबाबत माहिती देताना ग्रीन स्केपचे प्रमुख रूपेश कदम म्हणाले, शहराच्या विविध भागात दोन वाहनांच्या माध्यमातून ई वेस्ट संकलित करण्यात येत आहे. नागरिकांनी ई वेस्ट संकलित करून आम्हाला द्यावे. यासाठी एजन्सीची नेमणूक करण्यात आली.  एप्रिलपासून ई वेस्टसाठी नागरिकांना मोबदला देण्यास सुरूवात केले आहे. त्यानुसार लॅपटॉप, फ्रिज, टिव्ही, वातानुकुलित यंत्राला 10 रूपये किलो तर इतर वेस्टसाठी 8 रूपये किलो दराने पैसे देण्यास सुरूवात केली आहे. नागरिकांना ई वेस्ट दिले की जागेवरच पैसे देण्यात येत आहेत. तसेच ई वेस्ट संकलित करून त्याची रियूज रिसायकल व शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येणार आहे.

आयटी पार्क परिसरात ई-वेस्ट संकलनासाठी कॅम्प

शहरातील हिंजवडी आणि तळवडे परिसरात नामांकित आयटी कंपन्या आहेत. अभियंत्यांकडे जास्त प्रमाणात ई-वेस्ट असण्याची शक्‍यता आहे. हिंजवडी आयटीतील अभियंते, वाकड, रावेत, पिंपळे-सौदागर, पिंपळे गुरव भागात वास्तव्यास आहेत. तर तळवडे आयटीतील अभियंते निगडी, प्राधिकरण, संभाजीनगर, चिंचवड यासह आदी भागात वास्व्यास आहेत. या अशा भागात अभियंत्यांच्या सुट्टीच्या दिवशी म्हणजे शनिवार आणि रविवार ई-वेस्ट संकलनासाठी कॅम्प लावण्यात येणार असल्याचे रूपेश कदम यांनी सांगितले.

600 लॅपटॉप दुरूस्त करून गरजूंना दान

यापूर्वीही महापालिका आणि ग्रीन स्केप, ई.सी.ए यांच्यासह शहरातील इतर सामाजिक संस्थांच्या मार्फत ई वेस्ट संकलन मोहीम राबविण्यात आली आहे. यामध्ये दुरुस्त होऊ शकणारे 600 लॅपटॉप आणि कॉम्प्यूटर दुरुस्त करून वाटण्यात आले आहेत. यामध्ये महापालिकेच्या शाळांना 150 तर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांना 450 लॅपटॉप वाटले आहेत. यापुढेही दुरूस्त होऊ शकणारे लॅपटॉप, कॉम्प्यूटची दुरूस्ती करून गरजूंना देण्यात येणार आहेत.

हे स्वीकारले जाते

फ्रिज, वॉशिंग मशीन, फॅन, मायक्रोवेव्ह, वातानुकुलित यंत्रे, सीडी-डीव्हीडी प्लेयर, होम थिएटर्स, कॉम्प्यूटर, पेन ड्राइव्ह, हेड फोन्स, प्रिंटर्स, डिजिटल कॅमेरा, मोबाइल, चार्जर, टीव्ही, लॅपटॉप, व्हिडीओ कॅमेरा (Pimpri)

हे स्वीकारले जात नाही

ट्यूबलाईट, सीएफएल बल्ब्स, काच

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.