Pimpri: ‘लॉकडाऊन’मुळे आर्थिक संकट; सहा महिन्याचा सरसकट मालमत्तांचा कर माफ करा –  खासदार श्रीरंग बारणे

राज्य सरकार, महापालिका आयुक्तांना पाठविले पत्र

एमपीसी न्यूज – कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ‘लॉकडाऊन’ असल्याने कामगारगरीतील सर्व कारखाने, दुकाने, व्यावसाय बंद आहेत. नागरिक घरी राहून सरकारला सहकार्य करत आहेत. घरी असल्याने सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा आर्थिक फटका बसला असून सर्वजण अडचणीत आहे. यातून लवकर सावरणे कठीण आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा देण्यासाठी शहरातील सर्व मालमत्तांचा सहा महिन्यांचा  कर माफ करावा, अशी सूचना शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी आयुक्तांना केली आहे.  तसेच राज्य सरकारला देखील याबाबत पत्र पाठविले आहे.

याबाबत खासदार बारणे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात  बारणे यांनी म्हटले आहे की, सध्या कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. त्यामुळे कामगारनगरीतील सर्व जनजीवन ठप्प आहे. प्रत्येकजण घरात बसून लॉकडाऊनचे पालन करत देशसेवा करत आहे. अनेकांच्या हाताला काम नसल्यामुळे पैसा नाही. सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा आर्थिक फटका बसला आहे. यातून सर्वसामान्य नागरीक सावरणे कठीण आहे. या नागरिकांना दिलासा देणे महापालिकेचे कर्तव्य आहे.

पिंपरी-चिंचवड शहर कामगारांचीनगरी आहे. आजपर्यंत महापालिकेने कराच्या रूपाने कोट्यवधी रूपये वसूल केले आहेत. परंतु सर्वसामान्य माणूस अडचणीत असल्याने महापालिकेने मालमत्ताधारकांना दिलासा देणे आवश्यक आहे.  त्यासाठी  शहरातील सरसकट मालमत्तांचा पुढील सहा महिन्यांचा मिळकत कर माफ करावा, अशी सूचना खासदार बारणे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like