Pimpri: भाजप कार्यालयातील शिपायाने ‘ईद’साठी साठविलेले पाच हजार रुपये दिले पूरग्रस्तांना

एमपीसी न्यूज – बकरी ईद साजरी करण्यासाठी साठविलेले पाच हजार रुपये पूरग्रस्त बांधवांसाठी देत पिंपरी-चिंचवड शहर भाजप कार्यालयातील शिपायाने समाजापुढे आदर्श घालून दिला आहे. ‘बकरी ईद’चा खर्च टाळून त्यांनी ही दातृत्व भावना जोपासली असून त्यांच्या या दातृत्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

भाजप कार्यालयात तीन वर्षांपासून शिपाई म्हणून काम करणारे आझाद इब्राहिम शेख यांनी पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात दिला आहे. चिखलीतील घरकुल येथे राहणारे शेख यांनी बकरी ईद साजरी करण्यासाठी काटकसर करून पैसे साठविले होते. मात्र, सांगली आणि कोल्हापूर येथील पूरग्रस्तांसाठी हे पैसे देऊन त्यांनी समाजभान दाखविले आहे.

  • शेख यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पाच हजार रुपये दिले आहेत. भाजपच्या मोरवाडी येथील शहर कार्यालयात भाजपाचे शहर सरचिटणीस तथा शहर प्रवक्ते अमोल थोरात यांच्याकडे त्यांनी ही रक्कम सुपूर्द केली. यावेळी प्रमोद निसळ, नगरसेवक शितल शिंदे आदी उपस्थित होते.

अमोल थोरात, शेख यांनी समाजापुढे आदर्श घालून दिला आहे. आपले घर चालविताना कसरत होत असतानाही त्यांनी काटकसर करून बकरी ईद साजरी करण्यासाठी पैसे जमविले होते. ते पैसे त्यांनी पूरग्रस्तांसाठी दिले असून त्यांचे हे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.