Pimpri : कंपनीच्या मालाची परस्पर विक्री करून सव्वा दोन कोटींचा अपहार!

एमपीसी न्यूज – कंपनीसाठी आलेल्या मालाची परस्पर विक्री करून कंपनीची सुमारे 2 कोटी 24 लाख 53 हजार 973 रुपयांची फसवणूक केली. तसेच काम सोडून गेलेल्या कामगाराचा आयडी आणि पासवर्ड वापरून कंपनीच्या संगणकात फेरफार करून मालाच्या खोट्या नोंदी केल्या. याबाबत कंपनीतील एका कर्मचा-यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिजित सुरेश रानवडे (वय 41, रा. औंधगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सुशील सुरेश वाढोकर (वय 25, रा. प्राधिकरण, निगडी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड एमआयडीसी येथे सुशील यांची सुरेश प्रेस वर्क्स नावाची कंपनी आहे. या कंपनीत अभिजित कर्मचारी आहे. त्याने 10 एप्रिल 2018 ते 1 एप्रिल 2019 या कालावधीत इंजिनिअरिंग वर्क्स व स्टील ट्यूब कार्पोरेशन या कंपन्यांकडून माल घेताना कंपनीच्या परस्पर मालाची किंमत वाढवून कंपनीचे नुकसान केले.

कंपनीत येणार माल थेट कंपनीत न आणता बाहेर व्यापा-यांशी संगनमत करून त्या मालाची विक्री केली. याबाबत देखील कंपनीला काही समजू दिले नाही.

  • काम सोडून गेलेल्या कामगारांचे आयडी आणि पासवर्ड वापरून कंपनीच्या संगणकात मटेरियलच्या बिलांमध्ये फेरफार केले. कंपनीत न आलेला माल देखील वापरला गेल्याची नोंद केली. कंपनीचा बनावट रबरी शिक्का तयार करून कंपनीत न आलेल्या मालाची देखील समोरच्या व्यक्तींना पोहोच दिली. अभिजित याने एकूण 2 कोटी 24 लाख 53 हजार 973 रुपयांची फसवणूक केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.