Pimpri: गदारोळात संतपीठाचा विषय मंजूर, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे महापौरांच्या आसनासमोर आंदोलन

सभा एक तासासाठी तहकूब

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे टाळगाव चिखली येथे उभारण्यात येत असलेल्या ‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठा’चा विषय गदारोळातच महापौर राहुल जाधव यांनी उपसूचनेसह मंजूर केला. त्यामुळे सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी आक्रमक होत राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला. गोंधळ सुरू असताना सभा तहकूब न करता महापौर जाधव खुर्ची सोडून उठून गेले. 
पिंपरी-चिंचवड महापालिकेची जानेवारी महिन्याची तहकूब सभा आज (सोमवारी) आयोजित करण्यात आली आहे. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर राहूल जाधव आहेत. सभेच्या सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापौरांच्या असनासमोरील हौदात आंदोलन केले. नगरसेवकांनी संत पीठात भ्रष्टाचार झाल्याचे फलक हातामध्ये घेतले होते. या आंदोलनात विरोधी पक्षनेते दत्ता साने, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, मयूर कलाटे, प्रवीण भालेकर, पंकज भालेकर, राजू बनसोडे, समीर मासुळकर, माजी महापौर मंगला कदम, वैशाली काळभोर, वैशाली घोडेकर सहभागी झाले होते.

राजदंड पळविण्याचा प्रयत्न
विरोधी पक्षनेते दत्ता साने संत पीठावर बोलत होते. विकासकामतील होणाऱ्या रिंगबाबत बोलत असताना माजी महापौर नितीन काळजे यांनी त्यांना मध्येच अडविले. साने यांनी संत पीठावर बोलावे, असे काळजे म्हणाले. त्यानंतर साने आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी  महापौरांच्या असनासमोर धाव घेतली.  महापौरांसोबत वादावादी सुरू असतानाच महापौर जाधव यांनी  अचानक संत पिठाचा विषय मंजूर केला.  त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आक्रमक झाले. राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला.
सभा तहकूब केल्याचे जाहीर न करताच महापौर राहुल जाधव खुर्चीवरून उठून गेले.  दरम्यान, सभा एक तास तहकूब केल्याचे नगरसचिवांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.