Pimpri: मोबाईल ॲम्ब्युलन्सद्वारे कोविडच्या चाचण्या वाढवा – बाबू नायर

Increase covid tests by mobile ambulance - Babu Nair : बाधितांवर वेळीच उपचार करणे शक्य होईल

एमपीसी न्यूज – वेळीच निदान आणि तत्काळ उपचार मिळाल्यास कोरोनाची परिस्थित नियंत्रणात येईल. कोरोना संशयितांच्या चाचण्या जलद होणे आवश्यक आहे. त्याकरिता शहरातील कोरोना संशयितांच्या मोबाईल ॲम्ब्युलन्सद्वारे चाचण्यांमध्ये वाढ करावी, अशी मागणी भाजप सरचिटणीस, नगरसेवक बाबू नायर यांनी केली आहे. जेणेकरुन निदान लवकर होईल. बाधितांवर वेळीच उपचार करणे शक्य होईल. त्यामुळे मृत्यूचे प्रमाणही कमी होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. त्यात नगरसेवक नायर यांनी म्हटले आहे की, पालिकेच्या 32 प्रभागात तातडीने कोविड तपासणी सेंटर सुरु करावे. त्यासाठी खासगी रुग्णालये, डॉक्टरांची मदत घ्यावी.

रुग्णालयामध्ये ऑक्सीजन नसेल तर तिथे उपचार घेणा-या रुग्णांची प्रकृती खालावत आहे. त्यासाठी पालिका, खासगी रुग्णालयातील ऑक्सीजन मशीनचे प्रमाण वाढविण्यात यावे. रुग्णाला वेळीच ऑक्सीजन मिळाल्यास मृत्यूचे प्रमाण कमी होईल.

आठ क्षेत्रीय कार्यालयात मोबाईल ॲम्ब्युलन्सद्वारे चाचण्या कराव्यात. प्रत्येक कार्यालयाला चार ॲम्ब्युलन्स देण्यात याव्यात. त्या माध्यमातून दररोज रुग्ण तपासणी करण्यात यावी. झोपडपट्टीमधील नागरिकांच्या तपासणीला प्राधान्य द्यावे.

तसेच एखाद्याला कोविडची तपासणी करायची असेल तर ती कुठे करायची, याची माहिती देण्यात यावी. त्याची माहिती कुठे मिळेल. हेल्पलाईन आहे का, याची माहिती प्रसिद्ध करावी.

_MPC_DIR_MPU_II

वैद्यकीय, नर्सिंगचे शिक्षण घेणा-या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना क्षेत्रातील ज्ञान आहे. या कामासाठी त्यांचीही मदत घेण्यात यावी. मानधन देऊन पुढील काही महिन्यांसाठी त्यांची मदत घेतली तर मोठी मदत होईल.

अनेक पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये कोरोनाची काहीच लक्षणे नाहीत. लक्षणे विरहित रुग्णांकरिता होम क्वारंटाईनवर अधिक भर देण्यात यावा. आपल्याकडे केवळ 8 हजार बेड आहेत.

त्यामुळे लक्षणे विरहित रुग्ण होम क्वारंटाईन झाल्यास लक्षणे असलेल्या रुग्णांना बेड उपलब्ध करुन देता येतील. त्यांच्यावर वेळीच योग्य उपचार होतील, असेही नगरसेवक नायर यांनी म्हटले आहे.

अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी निष्क्रिय ठरले आहेत. त्यांच्याकडे काहीही माहिती मागविल्यास ते प्रतिसाद देत नाहीत. कोरोनाच्या लढाईत ते कोठेच दिसत नाहीत, असा आरोपही त्यांनी केला.

महापालिकेचे अनेक डॉक्टर, कर्मचारी, पोलिसांचे काम प्रशंसनीय आहे. कोरोनाच्या काळात विविध सामाजिक संस्थांनी मोठी मदत केली आहे. यापुढेही मदत कार्य सुरुच ठेवावे,असे आवाहनही नायर यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.